धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, नाहीतर आणखी मोठं आंदोलन; अभिजीत दिपकेंचा केंद्र सरकारला इशारा
नीट पेपरफुटीप्रकरणी देशातील वातावरण आता चांगलेच तापले आहे. कॉकरोच जनता पार्टीने आता अधिक आक्रमक भूमिका घेतली असून केंद्र सरकारला ठणकावले आहे. यावेळी कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा लवकरात लवकर राजीनामा घ्यावा अशी मागणी करत धर्मेंद्र प्रधानांसह, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सुद्धा निशाणा साधला आहे. तसेच, आणखी मोठ्या आंदोलनाची हाक देण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
अभिजीत दिपके म्हणाले की, जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर मुंबई आणि पुण्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून देशभरातून या आंदोलनाला प्रतिसाद मिळत आहे. बिहारमध्ये आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी सरकारला इशारा दिला की, “जितक्या विद्यार्थ्यांना अटक कराल, तितके अधिक विद्यार्थी आंदोलनात सहभागी होतील.”
त्यांनी दावा केला की, परदेशातील भारतीय नागरिकांनीही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा यापेक्षाही मोठ्या आंदोलनाची हाक दिली जाईल.
दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर टीका करत अभिजीत दिपके म्हणाले की, आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांना ताब्यात घेणे थांबवले नाही तर पोलीस मुख्यालयावर धरणे आंदोलन केले जाईल. त्यांनी दिल्ली पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप करत त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
यावेळी अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका केली. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबरोबरच सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, तरुण पिढी आता प्रश्न विचारण्यास घाबरत नसल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे कौतुक केले.
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर कारवाई करणाऱ्या संबंधित पोलिसांविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही दिपके यांनी दिला. विद्यार्थी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणात कायदेशीर लढा देण्याची भूमिका स्पष्ट केली.
आंदोलनात सहभागी असलेले सौरभ दास यांनीही दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर टीका केली. आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांच्या अन्नपुरवठ्यात अडथळे आणले जात असल्याचा आरोप करत त्यांनी विद्यार्थ्यांना उपाशी ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला. या सर्व घडामोडींमुळे NEET पेपरफुटी प्रकरणावरून केंद्र सरकारवरील राजकीय दबाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






