देशातील शहरी वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत केंद्र सरकारने अहमदाबाद मेट्रो रेल प्रकल्पाच्या फेज 2(A) ला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पामुळे अहमदाबाद आणि गांधीनगर परिसरातील नागरिकांना अधिक वेगवान, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या x च्या अकाऊंटवर हे ट्वीट करत माहिती दिली आहे. Nitin Gadakari Tweet
फेज 2(A) अंतर्गत कोटेश्वर रोड ते अहमदाबाद विमानतळ असा 6.032 किलोमीटर लांबीचा नवीन मेट्रो कॉरिडॉर विकसित करण्यात येणार आहे. या मार्गावर एकूण पाच स्थानके असतील. त्यापैकी चार स्थानके एलेवेटेड स्वरूपातील असतील, तर एक स्थानक अंडरग्राउंड असेल. या स्थानकांमध्ये आश्रम रोड, कोटेश्वर प्राचीन मंदिर, साबरमती नदी, सरदार नगर आणि विमानतळ या स्थानकांचा समावेश आहे.
“गडकरी मुख्यमंत्री असते तर…” प्रणिती शिंदे यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा
या प्रकल्पासाठी व्याजासह बांधकाम खर्च एकूण 2,169.04 कोटी रुपयांचा अपेक्षित आहे. या गुंतवणुकीमुळे केवळ वाहतूक व्यवस्थेचा विकास होणार नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.
फेज 2(A) पूर्ण झाल्यानंतर अहमदाबाद-गांधीनगर मेट्रो नेटवर्कची एकूण कार्यरत लांबी 77.63 किलोमीटरपर्यंत पोहोचेल. त्यामुळे शहरातील विविध भागांमधील संपर्क अधिक सुलभ होईल. विशेषतः विमानतळाशी थेट मेट्रो जोडणी उपलब्ध झाल्याने प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास कमी होईल आणि प्रवासाचा वेळही वाचेल.
देशभरातील टोल प्लाझा हटवणार; नितीन गडकरींची नवी योजना नेमकी काय?
रोजगार निर्मितीच्या दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. बांधकामाच्या वेळी सुमारे 2,000 लोकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर संचालन आणि देखभाल करण्यासाठी सुमारे 500 कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे.
या नव्या कॉरिडॉरमुळे रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होण्यास मदत होईल, परिणामी वाहतूक कोंडी आणि प्रदूषणात घट होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढल्यास इंधनाची बचत होईल आणि पर्यावरणीय लाभही मिळतील. त्यामुळे अहमदाबाद मेट्रोचा हा विस्तार प्रकल्प शहराच्या शाश्वत आणि स्मार्ट विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.






