प्रयागराज : सर्वोच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ला ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Mosque) परिसराचे सर्वेक्षण करण्यापासून रोखले होते. ज्ञानवापी मशिदीच्या व्यवस्थापनावर देखरेख करणाऱ्या अंजुमन समितीने वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान ज्ञानवापी मशीद परिसरातील सर्वेक्षण थांबवण्याचा आदेश देण्यात आला होता. पण आता अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad High Court) भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला वाराणसीतील ज्ञानवापी मशीद परिसराचे सर्वेक्षण करण्याची परवानगी दिली आहे.
Allahabad High Court allows the Archaeological Survey of India to conduct a survey of the Gyanvapi mosque complex in Varanasi pic.twitter.com/ONYJhAipeJ
— ANI (@ANI) August 3, 2023
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदी संकुलाचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली होती. काशी विश्वनाथ मंदिराशेजारी असलेली ज्ञानवापी मशीद मंदिरावर बांधलेली आहे की नाही हे शोधण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या पथकाने काही दिवसांपूर्वी वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीचे वैज्ञानिक सर्वेक्षण सुरू केले होते. त्यानंतर आता ज्ञानवापी मशीद परिसराचे सर्वेक्षण करण्याची परवानगी न्यायालयाकडून देण्यात आली आहे.