मित्रपक्ष बदलत राहिले मात्र खुर्चीवर टाच येऊ दिली नाही.. नितीशकुमार 23 वर्षात 9व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार

विद्यार्थीदशेपासून राजकारणात आलेल्या नितीश कुमार यांनी ५ वेळा मित्रपक्ष बदलली. 2005 मध्ये त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यांचा राजकीय प्रवास वाचा.

  बिहारमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा आपली राजकीय भूमिका बदलली आहे. 2005 पासून ते बिहारमध्ये सत्तेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. दरम्यान, जीतनराम मांझी २० मे २०१४ ते २० फेब्रुवारी २०१५ या काही महिन्यांसाठी स्वतःच्या इच्छेनुसार बिहारचे मुख्यमंत्री बनले. याआधी नितीश कुमार यांनी केंद्र सरकारमधील रेल्वेसह अनेक महत्त्वाच्या मंत्रालयांच्या जबाबदाऱ्याही सांभाळल्या आहेत. 2000 मध्ये ते पहिल्यांदाच सात दिवसांसाठी बिहारचे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून 23 वर्षे उलटून गेली आहेत. आतापर्यंत त्यांनी आठ वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आज सोमवारी (28 जानेवारी) ते नवव्यांदा शपथ घेणार आहेत.

  अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधील मंत्रीपदाच्या कार्यकाळापासून नितीश यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक राजकीय चढउतार आले. या वर्षांत त्यांनी आठ वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मित्रपक्ष बदलत राहिले, पण नितीशकुमार खुर्चीवर कायम राहिले. आज  जाणून घेऊयात नितीश कुमार यांच्या राजकीय प्रवासाविषयी..  ज्यामध्ये त्यांनी बिहारमध्ये कोणाच्याही सोबतीने सरकार बनवले असले तरी मुख्यमंत्री तेच राहिले आहेत. आता ते आज नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

  वीज मंडळाची नोकरी सोडून राजकारणात प्रवेश

  नितीश कुमार यांनी बिहार अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतली आणि विद्यार्थीदशेतच राजकारणात प्रवेश केला. मात्र, सक्रिय राजकारणात येण्यापूर्वी त्यांना बिहार राज्य विद्युत मंडळात नोकरी मिळाली. काही दिवस काम केल्यानंतर त्यांनी राजकारणाचा मार्ग स्वीकारला. लालू यादव राजकारणात प्रवेश करत होते तोच हा काळ होता. जनता दलात प्रवेश केल्यानंतर दोघांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.

  दोनदा निवडणुक हरले

  वीज मंडळाची नोकरी सोडल्यानंतर त्यांनी 1977 मध्ये जनता पक्षाच्या तिकिटावर हरनौत मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर अपक्ष भोलाप्रसाद सिंह या जागेवरून विजयी झाले होते. 1980 मध्ये त्यांनी याच जागेवरून जनता पक्षाच्या (सेक्युलर) तिकिटावर निवडणूक लढवली आणि अपक्ष अरुणकुमार सिंह यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. याच जागेवर तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी लोकदलाकडून 1985 ची निवडणूक लढवली आणि काँग्रेसच्या ब्रिज नंदन प्रसाद सिंह यांचा पराभव करून ते आमदार झाले. त्यानंतर त्यांनी जनता दलात प्रवेश केला.

  अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात राजकीय उंची वाढली

  यानंतर 1989 मध्ये जनता दलाकडून बारह लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून ते लोकसभेत पोहोचले. या जागेवर नितीश कुमार यांनी काँग्रेसचे राम लखन सिंह यादव यांचा पराभव केला होता. 1991, 1996, 1998, 1999, 2004 या लोकसभा निवडणुका जिंकून ते सातत्याने खासदार झाले आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात नितीश कुमार यांचा राजकीय वजन  खूप वाढले. या काळात त्यांना केंद्रात रेल्वेसारख्या महत्त्वाच्या मंत्रालयाची जबाबदारी मिळाली. 2004 मध्ये नितीश कुमार यांनी बाढ आणि नालंदा या दोन जागांवरून निवडणूक लढवली होती. ते नालंदामधून जिंकले , पण बाढमध्ये त्यांचा पराभव झाला.

  भाजपच्या सांगण्यावरून बिहारचे मुख्यमंत्री झाले

  नितीश कुमार यांना बिहारचे मुख्यमंत्री करण्यात भाजपचा मोठा वाटा असल्याचं बोललं जातंय. बिहारमध्ये 2000 मध्ये एनडीएला पहिल्यांदा सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली. तेव्हा नितीशकुमार समता पक्षाचे नेते होते. ही निवडणूक भाजप, जनता दल आणि समता पक्षाने एकत्र लढवली होती. निवडणुकीत भाजपला 67, समता पक्षाला 34 आणि जनता दलाला 21 जागा मिळाल्या. RJD 124 जागांसह सर्वात मोठा पक्ष होता, पण त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत नव्हते. त्यावेळी झारखंडची निर्मिती झाली नव्हती आणि बिहार विधानसभेत 324 जागा होत्या. तेव्हा भाजपच्या नेत्यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी पुढे केले, तर त्यांचाच पक्ष समता पक्ष त्यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या बाजूने नव्हता.

  नितीश पहिल्यांदाच ७ दिवसांसाठी मुख्यमंत्री झाले

  भाजप नेते सुशील मोदी यांनी नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करण्याचा प्रस्ताव त्यांच्या नेत्यांसमोर ठेवला होता. लालकृष्ण अडवाणी आणि अरुण जेटली यांच्यासारख्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे पहिल्यांदाच नितीशकुमार यांची बिहारमध्ये एनडीएच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. त्यानंतर नितीशकुमार सात दिवसांसाठी बिहारचे मुख्यमंत्री झाले.

  विधानसभेत बहुमत सिद्ध करू न शकल्याने त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तथापि, 2005 च्या निवडणुकीत विजयानंतर त्यांनी 24 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि 17 मे 2014 पर्यंत  मुख्यमंत्री राहिले.

  मुख्यमंत्रीपदाची कहाणी

  3 मार्च 2000 रोजी नितीश कुमार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. मात्र, बहुमत जमवता न आल्याने 10 मार्च 2000 रोजी त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर 2005 मध्ये बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपच्या पाठिंब्याने नितीश दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. 2010 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले.

  2014 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडले

  2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात पक्षाच्या खराब कामगिरीमुळे त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यादरम्यान त्यांनी जीतनराम मांझी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सोपवली. मात्र, 2015 मध्ये पक्षात अंतर्गत कलह सुरू झाल्यावर नितीश यांनी मांझी यांना हटवून पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद काबीज केले.

  निवडणुकीत महाआघाडीने बाजी मारली

  2015 च्या विधानसभा निवडणुकीत NDA विरुद्ध महाआघाडी (JDU, RJD, काँग्रेस आणि डावी आघाडी) च्या विजयानंतर नितीश कुमार पुन्हा एकदा पाचव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले.

  तेजस्वी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर भूमिका बदलली

  2017 मध्ये, आयआरसीटीसी घोटाळ्यात आरजेडी आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर, नितीश कुमार यांनी महाआघाडीशी संबंध तोडले. त्यांनी जुलै 2017 मध्येच पदाचा राजीनामा दिला आणि पुन्हा एकदा एनडीएमध्ये सामील झाले आणि मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

  2020 मध्ये सातव्यांदा मुख्यमंत्री झाले

  2020 च्या विधानसभा निवडणुकीत एनडीए आघाडीने बाजी मारली. मात्र, भाजपच्या तुलनेत जेडीयूच्या जागांमध्ये लक्षणीय घट झाली. असे असतानाही नितीश कुमार यांनी सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

  2022 मध्ये पुन्हा महाआघाडीसोबत आले

  ऑगस्ट 2022 मध्ये, त्यांनी पुन्हा एकदा NDA सोडले आणि महाआघाडीत सामील झाले आणि आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आता पुन्हा एकदा त्यांनी महाआघाडीशी संबंध तोडले असून एनडीएसोबत नवव्यांदा शपथ घेणार आहे.

  अशी आहे कौटूंबिक पार्श्वभूमी 

  नितीश कुमार यांचा जन्म १ मार्च १९५१ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कविराज राम लखन सिंग आहे. आईचे नाव परमेश्वरी देवी. त्यांची पत्नी मंजू कुमारी सिन्हा यांचे निधन झाले असून मुलाचे नाव निशांत आहे. त्यांचे मूळ गाव नालंदा जिल्ह्यातील कल्याण बिघा आहे, परंतु नितीश कुमार यांचे वडील बख्तियारपूर, पाटणा येथे राहत होते, जिथे त्यांचा जन्म झाला.