या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट, काँग्रेस व काही अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने पंचरंगी लढत स्पष्ट झाली आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून उमेदवार घरोघरी जाऊन जोरदार प्रचार करत आहेत. भाजपाकडून भाजप युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष रविश पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी प्रचारात सक्रिय आहेत. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना ठाकरे गटाकडून सर्व गटांत उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचार यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत आहे. दरम्यान आरपीआय (गवई गट), आरपीआय (आठवले गट), आम आदमी पार्टी, जनता दल आदी पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत पाठिंबा मिळवण्यासाठी उमेदवारांकडून जुळवाजुळव सुरू आहे. पहिल्या टप्प्यातच तर्क-वितर्काना उधाण आले असून काही ठिकाणी निकालाबाबत पैजाही रंगू लागल्या आहेत. राधानगरी तालुक्यातील ही निवडणूक अत्यंत हायव्होल्टेज ठरणार असून नेमकी बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे केडीसीसी बँकेचे ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील यांचे सर्व कार्यकर्ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले असून आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जात आहे. काँग्रेसच्या प्रचारात राहुल पाटील गट (भोगावती साखर कारखाना संचालक गट) सक्रिय झाला आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला शेतकरी कामगार पक्षाचा अधिकृत पाठिंबा मिळाला असून तालुक्यातील पाचही गटांत एकमुखी उमेदवार देण्यात आले आहेत. मात्र महायुतीतील घटक पक्षांमध्ये एकमत न झाल्याने भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यासह प्रत्येक पक्षाने स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरवले आहेत.
महिला आरक्षित कसबा तारळे गटात दिग्जज उमेदवार उतरले आहेत. भाजपाच्या ऋतुज राविश पाटील कौलवकर, काँग्रेसकडून भाग्यश्री धीरज डोंगळे, राष्ट्रवादी अजित पवान गटामार्फत अमृता अरुण डोंगळे, शिवसेना शिंदे गटाकडून राजश्री अमृत पाटील यांच्यात चुरशीची लढत पहावयास मिळत आहे.






