"मी राहतो दिल्लीत, पण कान तमिळनाडूत" ; अमित शाहांचा DMK वर हल्लाबोल
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने तमिळनाडूत आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी मदुराई येथे झालेल्या सभेत डीएमके सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत, जनतेला सत्तांतराची साद घातली.
Chirag Paswan : चिराग पासवान यांची मोठी घोषणा; बिहार विधानसभेच्या सर्व २४३ जागा लढवणार
“मी राहतो दिल्लीला, पण माझे कान तमिळनाडूमध्ये आहेत. डीएमके सरकारने गेल्या चार वर्षांत भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या ४५० कोटींच्या पोषण किट्स खासगी कंपन्यांकडे सोपवून गरीबांचं अन्न हिरवालं आहे, असा आरोप त्यांनी केला.
४६०० कोटींच्या अवैध वाळू खाण घोटाळ्याचा उल्लेख करत ते म्हणाले, याचा थेट परिणाम राज्यातील गरीबांवर झाला आहे. त्याचप्रमाणे, तास्माक (TASMAC) घोटाळ्याच्या माध्यमातून राज्याला ३९,००० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावाही त्यांनी केला. “ही रक्कम वापरून तमिळनाडूतील प्रत्येक शाळेला दोन नवीन वर्ग खोल्या देता आल्या असत्या, असा दावा त्यांनी केला.
याशिवाय, त्यांनी स्टालिन सरकारवर केलेल्या निवडणुकीच्या वचनांचा ६० टक्के भागही न पूर्ण केल्याचा आरोप केला. “मी सगळ्या भ्रष्टाचाराची यादी आणली आहे, पण वेळ वाया घालवू इच्छित नाही. स्टालिन यांनी जनतेला सांगावे की त्यांनी किती वचनं पाळली आहेत,” असं थेट आव्हान त्यांनी दिलं.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाने अलीकडेच डीएमके सरकारच्या याचिकेवर निर्णय देत, ईडीच्या चौकशीवर स्थगिती दिली होती. या पार्श्वभूमीवर, अमित शाह यांचे हे वक्तव्य राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जात आहे. आगामी निवडणुकांमध्ये भाजप तमिळनाडूत सरकार स्थापनेच्या इराद्यानेच मैदानात उतरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.