"बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात," भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
Bihar Election news Marathi : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरु असल्याचे दिसून येता आहे. विविध राजकीय पक्षांमध्ये वाटाघाटींवर खल सुरू आहे. तर भारतीय निवडणूक आयोगाने एसआयआरची (सखोल मतदार पडताळणी) आकडेवारी जाहीर केली आहे. दरम्यान निवडणूक आयोग बिहार विधानसभा (Bihar Election) निवडणुकीची तयारी अंतिम करत आहे. बिहारची राजधानी पाटणा येथील ताज हॉटेलमध्ये आज (4 ऑक्टोबर) सर्व राजकीय पक्षांसोबत बैठक झाली. या बैठकीत भाजपने निवडणूक आयोगाने दोन टप्प्यात निवडणुका घेण्याची मागणी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी बैठकीचे अध्यक्षपद भूषवले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी निवडणूक आयोगाने दोन टप्प्यात निवडणुका घेण्याची मागणी केली. कारण अनेक टप्प्यांमुळे मतदारांची गैरसोय होईल. अनेक टप्प्यांमुळे उमेदवारांना अधिक आर्थिक खर्च करावा लागेल असा युक्तिवादही त्यांनी केला. बिहार भाजपने निवडणूक घोषणेनंतर २८ दिवसांनी निवडणुका घेण्याची मागणी केली. या बैठकीपूर्वीच निवडणूक आयोगाने सर्व राष्ट्रीय आणि राज्य मान्यताप्राप्त पक्षांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. या बैठकीनंतर, निवडणूक आयोग पुढील आठवड्यात तारखा जाहीर करेल हे जवळजवळ निश्चित आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल म्हणाले, “या बैठकीत, आम्ही निवडणूक आयोगाकडे दोन टप्प्यात निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. अत्यंत मागासलेल्या समुदायांच्या गावांमध्ये निमलष्करी दल तैनात करावे. मतदारांपर्यंत मतदारांच्या स्लिप वेळेवर पोहोचतील याची खात्री करावी.” भाजप, काँग्रेस, राजद आणि जेडीयूचे नेते निवडणूक आयोगाच्या बैठकीला उपस्थित होते. जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश राम आणि शकील अहमद खान सहभागी झाले होते. आरजेडीचे खासदार अभय कुशवाह आणि चित्तरंजन गगन आणि बसपाचे खासदार शंकर महातो सहभागी झाले होते.
मागील बिहार विधानसभा निवडणुकीबाबत, २०२० मध्ये तीन टप्प्यात मतदान झाले होते. शिवाय, २०१५ च्या निवडणुका पाच टप्प्यात झाल्या होत्या. यावेळीही निवडणूक आयोग तीन किंवा पाच टप्प्यात निवडणुका घेईल असे मानले जाते.