मायावतींच्या पक्षात मोठी उलथापालथ! आकाश आनंद यांची सर्व पदांवरून हकालपट्टी
बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी त्यांचे पुतणे आकाश आनंद यांची काही दिवसांपूर्वी समन्वयकपदी नियुक्ती केली होती. आकाश आनंद यांना त्यांचा राजकीय उत्तराधिकारी म्हणून जाहीर करण्यात आलं होतं. मात्र आज त्यांची तडकाफडकी पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. मायावती यांनी राज्यसभा खासदार रामजी गौतम यांच्यावरील जबाबदारी वाढवली आहे.
मायावती यांनी रामजी गौतम यांची पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक पदावर नेमणूक केली आहे. यापूर्वी मायावती यांनी आकाश आनंद यांचे सासरे अशोक सिद्धार्थ यांच्याकडील पक्षाच्या जबाबदाऱ्या काढून घेतल्या होत्या. बसपा प्रमुख मायावती यांनी आज पक्षाची एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत हे निर्णय जाहीर केले. दरम्यान, आता मायावती यांचा उत्तराधिकारी कोण असेल असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र, मायावती यांनी यावरही पक्षाच्या बैठकीत उत्तर दिलं. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझा कोणीही उत्तराधिकारी नसेल असं त्यांनी जाहीर केलं आहे.
या बैठकीला मायावती, राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि मायावतींचे भाऊ आनंद, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा उपस्थित होते. पक्षाच्या बैठकीत राज्यसभा खासदार रामजी गौतम हे देखील उपस्थित आहेत पण आकाश आनंद या बैठकीला आले नाहीत.
गेल्या वर्षी मे महिन्यात मायावतींनी त्यांचे पुतणे आकाश आनंद यांना बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक आणि त्यांच्या उत्तराधिकारी पदावरून काढून टाकले होते. बसपा सुप्रिमोने डिसेंबर २०२३ मध्ये त्यांना आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायावतींनी मंगळवारी आपला निर्णय मागे घेतला. त्यांनी सांगितले की, आकाश आनंद पूर्ण परिपक्वता येईपर्यंत त्याला दोन्ही महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांपासून दूर ठेवण्यात येईल.
आकाश आनंद यांनी सीतापूरमधील भाजप सरकारला ‘दहशतीचं सरकार’ म्हटलं होतं, त्यानंतर त्यांच्याविरुद्ध एफआयआर देखील दाखल करण्यात आला होता. याशिवाय, आणखी दोन ठिकाणी त्याने अपशब्धही काढले होते. रागाच्या भरात केलेल्या त्यांच्या विधानांवरही बरीच टीका होत होती.