File Photo : Zika virus
नवी दिल्ली : देशासह महाराष्ट्रातही झिका व्हायरसच्या बाधितांचे प्रमाण वाढत आहे. ही एक चिंतेची बाब बनत चालली आहे. असे असतानाच पुण्यात सातवा संक्रमित रुग्ण आढळला. अशाप्रकारे रुग्णसंख्या वाढत आहे. त्यानुसारच, आता केंद्र सरकारकडून झिका व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याचे पालन करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
देशातील झिका विषाणूच्या परिस्थितीवर दक्ष राहण्याची गरज असल्याचे या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. राज्यांना बाधित भागातील आरोग्य सुविधांना सूचना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यांना आरोग्य सुविधा / रुग्णालयांना नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्याचा सल्ला देण्याचे निर्देश देण्यात आले असून, परिसर एडिस डासमुक्त ठेवण्यासाठी देखरेख ठेवण्याचे काम ते करतील. आढळलेल्या प्रकरणाची एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम आणि ‘नॅशनल सेंटर फॉर व्हेक्टर बोर्न डिसीजेस कंट्रोल’कडे तक्रार करण्याचे आवाहनही राज्यांना करण्यात आले आहे.
झिका हा डेंग्यू आणि चिकुनगुनिया सारखा एडिस डासांमुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. घातक नसलेला, परंतु बाधित गर्भवतींमध्ये जन्मलेल्या बाळांच्या मायक्रोसेफली (डोक्याचा आकार कमी) शी संबंधित आहे. ही एक या आजाराची प्रमुख चिंता आहे.
गुजरातमध्ये आढळला पहिला रुग्ण
भारतात 2016 मध्ये गुजरातेत प्रथम झिका रुग्णाची नोंद झाली. तेव्हापासून, तमिळनाडू, मध्यप्रदेश, राजस्थान, केरळ, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, दिल्ली आणि कर्नाटक या राज्यांतही रुग्ण आढळले आहेत.