चित्रकूट : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी चित्रकूटमध्ये भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांचे कौतुक केले. ते म्हणाले, काही वर्षांपूर्वी मध्य प्रदेश हे आजारी राज्याच्या श्रेणीत येत होते. त्यानंतर राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हे सर्वोत्तम राज्य बनवले.
तसेच जे. पी. नड्डा पुढे म्हणाले, ‘जनआशीर्वाद यात्रेचे उद्दिष्ट आमची कामे जनतेपर्यंत पोहोचवणे हे आहे. आम्ही छिंदवाडा येथेही वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले आहे. कमलनाथ यांचे भ्रष्टाचारी नाथांचे सरकार लक्षात ठेवा. ते भ्रष्टाचाराने भरलेले सरकार होते. कमलनाथ यांनी पंतप्रधान आवास योजना रुळावरून घसरण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. योजनेची यादी दिल्लीपर्यंत पोहोचू दिली नाही. त्यानंतर तीन वर्षात शिवराज सिंह यांनी गृहनिर्माण योजना क्रमांक 1 वर नेण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
काँग्रेसने आमची योजना रोखली : शिवराज
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, ‘काँग्रेसच्या भ्रामक आश्वासनांमध्ये वाहून जाऊ नका. यापूर्वी त्यांनी 900 आश्वासने दिली होती. परंतु, त्यांनी दिलेले एकही पूर्ण केले नाही, ते फक्त बोलतात. मात्र, आम्ही ते करतो. बेईमान कॉंग्रेसने भाजप सरकारच्या अनेक योजना बंद केल्या. मुलींच्या लग्नाची योजना, तीर्थयात्रा योजना, मुलांना लॅपटॉप देण्याची योजना, शिष्यवृत्ती योजना या सर्वच योजना बंद केल्या, असेही शिवराज चौहान यांनी म्हटले आहे.