Photo : Arvind Kejriwal
नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया (Manish Sisodia) सध्या अटकेत आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) त्यांची तब्बल 8 तास चौकशी केली होती. मद्य धोरण घोटाळ्यात नाव आल्यानंतर सिसोदिया यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यासोबत सत्येंद्र जैन यांनीही राजीनामा दिला. पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी राजीनामा मंजूर केला. त्यानंतर आता दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आपच्या आमदार-नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली आहे.
सिसोदिया यांचे नाव घोटाळ्यात आल्यानंतर भाजप-काँग्रेसकडून मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर दबाव वाढत होता. त्यानंतर तुरुंगात असलेल्या दोन ज्येष्ठ मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाचे आमदार आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांची नावे मंत्रिमंडळातील नवीन नियुक्त्यांसाठी नायब राज्यपालांकडे पाठवली आहेत. हे दोन्ही नेते केजरीवाल मंत्रिमंडळात मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांची जागा घेतील, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, पुढील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आमदार-नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आम आदमी पक्षाचे आमदार आणि नगरसेवक सहभागी होणार आहेत. सिसोदिया यांच्या अटकेमुळे भविष्यातील योजनांवर आज चर्चा होणार आहे.
2024 मध्ये लोकसभा निवडणूक
2024 च्या लोकसभा निवडणुकाही तोंडावर आल्या आहेत. हे दोन्ही बडे नेते दीर्घकाळ तुरुंगात राहिले तर केजरीवाल यांना वेगळी रणनीती आखावी लागणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता केजरीवाल यांनी ही बैठक बोलावली असेल, असे म्हटले जात आहे.
कैलाश गेहलोत यांच्याकडे अर्थ खाते
कैलाश गेहलोत यांच्याकडे अर्थ खाते देण्यात आले असून, अशा परिस्थितीत ते अर्थसंकल्प सादर करतील. केजरीवाल यांनी ही तत्काळ अडचण दूर केली असली तरी असे अनेक अडथळे मार्गात येणार आहेत. नायब राज्यपालांनी 2 नवीन मंत्र्यांचा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. एक-दोन दिवसांत त्यावर शिक्कामोर्तब होईल, असे सांगितले जात आहे.