'केजरीवाल आणि आतिशी दोघांचाही पराभव होणार?' या बड्या नेत्याचा दावा
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून आम आदमी पक्ष, भाजप आणि कॉंग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान आज भाजपचे नेते अमित शहा यांनी अरवींद केजरीवाल आणि आतिशी, दोघांचाही त्यांच्या मतदार संघातून पराभव होणार असल्याचा दावा केला आहे. तसंच भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबतही भाष्य केलं आहे. एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत ते बोलत होते.
अमित शहा यांची मंगळवारी बदरपूर विधानसभा मतदारसंघात सभा झाली. अमित शहा यांनी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यासह इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. त्यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या सरकारवर जोरदार निशाणा साधला.
अमित शहा म्हणाले की, गरिबांसाठी असलेली एकही कल्याणकाही योजना बंद करणार नाही, असा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. देशातील गरिबांच्या कल्याणासाठी पहिली योजना २०१४ नंतर नरेंद्र मोदींनी सुरू केली. मग ती उपचार योजना असो, मोफत घर असो, शौचालय असो, रेशन असो किंवा गॅस सिलेंडर असो. पायाभूत सुविधांच्या विकासाकडे दुर्लक्ष करून केजरीवाल यांनी मोफत योजना बनवली. भाजपने पायाभूत सुविधांची उभारणी केली आणि गरीब कल्याणकारी योजनाही राबवल्या. मग ते मध्यप्रदेश असो, छत्तीसगड असो किंवा इतर कोणतंही राज्य असो.
जर दिल्लीत भाजपचा विजय झाला तर मुख्यमंत्री कोण असेल? प्रवेश वर्मा मुख्यमंत्री होतील का? या प्रश्नाच्या उत्तरात अमित शहा म्हणाले की, केजरीवाल स्वतः नवी दिल्लीतून हरणार आहेत. आतिशी यांचा देखील पराभव होणार आहे. आमचा सध्याचा प्रयत्न दिल्लीवर विजय मिळवण्याचा आहे. त्यानंतर मुख्यमंत्री ठरवला जाईल. दिल्लीच्या ७० लोकांना वाटतं की ते दिल्लीचे मुख्यमंत्री बनू शकतात. मात्र मुख्यमंत्रिपदाच्या खुर्जीवर कोणाचीही वर्णी लागू शकते, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दिल्लीतील भाजपचा राजकीय वनवास संपणार आहे का? यावर शाह म्हणाले की, खोट्याचे आयुष्य जास्त काळ नसतं. केजरीवाल सरकारला १० वर्षे झाली आहेत. आता खोटेपणा उघड झाला आहे. ज्या पद्धतीने त्यांनी दिल्लीत विस्कळीतपणा चालवला, त्यातून सर्वत्र अराजकता आहे.
भाजपचे हरियाणा सरकार यमुनेत विष मिसळत असल्याचा आरोप आपने केला आहे. यावर अमित शहा म्हणाले की, आज मी त्यांना विचारले आहे की त्यांनी कोणते विष मिसळले आहे, कृपया त्याचे नाव सांगा. विष मिसळले आहे, त्याचा चाचणी अहवाल कुठे आहे? जर पाणी थांबवले तर किमान १० गावे पाण्याखाली जातील. पण एकही गाव पाण्याखाली गेले नाही. ते खोटं बोलून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. ते जनतेला घाबरवून आणि दहशत पसरवून जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आणि हरियाणा सरकार त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करणार आहे.