Delhi Traffic Advisory (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Delhi traffic advisory monsoon session 2026: संसद अधिवेशनादरम्यान विविध राजकीय कार्यक्रम आणि सुरक्षा व्यवस्था लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी विशेष ट्रॅफिक प्लॅन तयार केला आहे. त्यामुळे कार्यालयीन वेळेत आणि दिवसभर काही प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्य असल्यास अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने संसद भवन, जंतर-मंतर आणि आसपासच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस दलासोबत निमलष्करी जवानही तैनात असून, प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे. संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा तपासणी केली जाणार असल्याने वाहनांच्या वेगावरही परिणाम होऊ शकतो. आज सर्वाधिक वाहतुकीचा ताण विजय चौक, पटेल चौक, बोट क्लब, रेल भवन परिसर, सुनेहरी मशीद गोलचक्कर, बुटा सिंग चौक, जीआरजी गोलचक्कर आणि जलेबी चौक या भागांमध्ये जाणवू शकतो. या ठिकाणी वाहनांची गती कमी राहण्याची शक्यता असल्याने चालकांनी वेळेचे योग्य नियोजन करावे.
याशिवाय काही महत्त्वाचे रस्ते टाळण्याचा सल्लाही प्रशासनाने दिला आहे. रफी मार्ग, संसद मार्ग, रायसीना रोड, मौलाना आझाद रोड, मोतीलाल नेहरू मार्ग, के. कामराज मार्ग, अशोक रोड, टॉकटोरा रोड, पंडित पंत मार्ग, राजेंद्र प्रसाद रोड आणि रकाबगंज गुरुद्वारा रोड या मार्गांवर वाहतुकीचे निर्बंध लागू असू शकतात. त्यामुळे या भागात जाण्यापूर्वी वाहतुकीची ताजी माहिती तपासणे आवश्यक ठरेल. वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पर्यायी मार्गही निश्चित करण्यात आले आहेत. जनपथ, अकबर रोड, मान सिंग रोड, तीन मूर्ती मार्ग, शांती पथ, कमाल अतातुर्क मार्ग, पंचशील मार्ग, विनय मार्ग, बाबा खरक सिंग मार्ग, आउटर सर्कल, मदर तेरेसा क्रिसेंट रोड आणि सरदार पटेल मार्ग या रस्त्यांचा वापर केल्यास प्रवास तुलनेने सोपा होऊ शकतो.
दिल्ली पोलिसांनी नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करण्याचाही सल्ला दिला आहे. शक्य असल्यास मेट्रो किंवा इतर सार्वजनिक सेवा निवडल्यास वेळ आणि इंधन दोन्हीची बचत होईल. खासगी वाहन घेऊन बाहेर पडणाऱ्यांनी गर्दीच्या भागांपासून दूर राहावे, असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, नवी दिल्ली परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव काही ठिकाणी मोर्चे, निदर्शने आणि मोठ्या प्रमाणातील जमावावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित भागात पोलिसांकडून कडक तपासणी केली जाईल. नागरिकांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आज दिल्लीत प्रवास करणाऱ्यांनी घराबाहेर पडण्यापूर्वी वाहतुकीची अद्ययावत माहिती तपासणे, पुरेसा अतिरिक्त वेळ ठेवणे आणि पर्यायी मार्गांची निवड करणे अधिक योग्य ठरेल. योग्य नियोजन केल्यास वाहतूक कोंडीचा त्रास टाळता येईल आणि प्रवासही अधिक सुरक्षित होईल.






