नवी दिल्ली : नव्या संसद भवनाचे (New Parliament) उद्घाटन आज होत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी उपस्थिती लावली आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुजा आणि होमहवन सध्या केले जात आहे. या पुजेनंतर पंतप्रधान मोदींनी तेथे उपस्थित सेंगोल घेऊन साधू-संतांचे आशीर्वाद घेतले.
या नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून राजकीय गोंधळ सुरू आहे. विरोधी पक्ष आणि सरकार या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र आहे. त्यात आता हा उद्घाटन कार्यक्रम होत आहे. यासाठी भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री, खासदार तसेच इतर नेते कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित राहतील. जवळपास 21 विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला तर 25 पक्षांनी या कार्यक्रमात उपस्थित राहणार असल्याचे कळवले आहे.
दरम्यान, दिल्ली पोलिसांना आता नवीन संसद भवनाबाहेरील भिंतींवर सरकारविरोधी आणि पंतप्रधान विरोधी घोषणा लिहिल्या जाऊ शकतात, असे इनपुट मिळाले आहेत. या इनपुटच्या आधारे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नवीन संसद भवनाभोवती दिल्ली पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यासोबत एसीपी दर्जाचे अधिकारी देखरेख करत आहेत.
विरोधकांना विश्वासात घेतले नाही
विरोधकांना विश्वासात न घेता सर्व निर्णय घ्यायचे असतील तर विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी अशी भूमिका घेतली की आपण संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला जाऊ नये, त्यामुळे माझाही त्या पाठिबा आहे.
– शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी