नवी दिल्ली : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यात आपचे खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ईडीच्या या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले. रात्रभर ईडीच्या मुख्यालयात (ED Office) ठेवल्यानंतर त्यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने संजय सिंह यांना पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला होणार आहे.
ईडी अधिकाऱ्यांनी संजय सिंह यांची तब्बल 10 तास कसून चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक केली. या कारवाईची माहिती मिळताच आपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने तेथे जमा झाले होते. त्यानंतर निमलष्करी दलाच्या जवानांची संख्याही वाढविण्यात आली. संजय सिंह यांना मागच्या दाराने बाहेर काढून ईडी मुख्यालयात आणण्यात आले. संजय सिंह यांच्याविरोधात सबळ पुरावे असताना त्यांना अटक करण्यासाठी एवढा वेळ का लागला? तसेच तुम्ही (ईडी) ज्या पैशांच्या व्यवहाराबाबत बोलत आहात, ते जुने प्रकरण आहे, मग अटकेला एवढा विलंब का? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.
कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
संजय सिंह यांच्या अटकेविरोधात मध्य दिल्लीत निदर्शने करणाऱ्या शेकडो आप कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. डीडीयू मार्गावर असलेल्या आम आदमी पार्टीच्या कार्यालयात पक्षाचे अनेक कार्यकर्ते जमले. त्यांनी केंद्राच्या विरोधात घोषणाबाजी करत सिंग यांच्या सुटकेची मागणी केली.
हे लोक खोटे गुन्हे दाखल करताहेत : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यावर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, हे लोक सर्व खोट्या केसेस दाखल करत आहेत. त्यांनी इतके गुन्हे दाखल केले, खूप तपास केला पण काहीही निष्पन्न होत नाही. या तपासाच्या खेळात प्रत्येकाचा वेळ वाया जात आहे.