दिल्लीच्या अनेक भागात पूर परिस्थिती; यमुना नदीने ओलांडली धोक्याची पातळी, NDRF तैनात(संग्रहित फोटो)
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. या पावसामुळे जनजीवन अक्षरश: विस्कळीत झाले आहे. उत्तर भारतात सप्टेंबरची सुरुवात पावसाळी झाली. दोन दिवसांपासून राजधानी दिल्ली आणि आसपासच्या भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर भारतातील काही इतर राज्यांमध्येही परिस्थिती बिकट झाली आहे.
हवामान खात्याने या भागात पावसाबाबत रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केले आहेत. उत्तर भारतात आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्याने जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याचवेळी, शेजारच्या हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्येही मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. आयएमडीने जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नोएडा आणि गाझियाबादसह पश्चिम उत्तर प्रदेशातील काही भागात अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे यमुना नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. सखल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यमुना नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे यमुना बाजारातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. यमुना बाजार परिसरात एनडीआरएफची टीम तैनात आहे.
सखल भागात सुमारे 5-6 फूट पाणी
सुमारे ५-६ फूट पाणी आहे. सखल भागातील लोकांना घरातून बाहेर काढण्यात आले आहे. अजूनही काही लोक आहेत ज्यांना सुरक्षित ठिकाणी येण्यास सांगण्यात आले आहे. मंगळवारी रात्रीपासून येथे पथक तैनात आहे.
अनेक राज्ये आणि शहरांमध्ये शाळा बंद
मुसळधार पावसाचा इशारा पाहता, अनेक राज्ये आणि शहरांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, नोएडा, गाझियाबाद, चंदीगड, शिमला आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये आज शाळा बंद राहतील.
हिमाचल प्रदेशातही मुसळधार पाऊस
हिमाचल प्रदेशात सोमवारी रात्री उशिरा दरड कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. कुल्लू, सुंदरनगर, चिदगाव येथे भूस्खलनामुळे चार जणांचा मृत्यू झाला. शिमला-कालका रेड सेक्शनवर भूस्खलन झाल्याने ५ सप्टेंबरपर्यंत रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. खराब हवामानामुळे अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत.