सरकारने अनिवासी भारतीय व आंतरराष्ट्रीय व्यवसायांना भारतातील रीटेल क्षेत्रात गुंतवणुकीस प्रोत्साहन द्यावे : डॉ. धनंजय दातार

मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांची आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाकडून अपेक्षा

    मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेला(Indian Economy) प्रचंड ताकद देण्याचे सुप्त सामर्थ्य रीटेल क्षेत्रात (Retail Sector)आहे, परंतु भारतात एकतर या क्षेत्रात खूप कमी व्यावसायिक आहेत आणि जे आहेत ते उच्च करांच्या दडपणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सक्षमतेने स्पर्धा करु शकत नाहीत. त्यावर उपाय म्हणून सरकारने हे व्यावसायिक व सर्वसामान्यांवरील करांचे ओझे कमी करावे आणि अनिवासी भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय व्यवसायांना भारतातील रीटेल क्षेत्रात थेट गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन द्यावे, अशी अपेक्षा अदील ग्रुप ऑफ सुपरमार्केट्स कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार (Dr. Dhananjay Datar) यांनी आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाकडून व्यक्त केली आहे. (Government should encourage non-resident Indian and international businesses to invest in India’s retail sector : Dr. Dhananjay Datar )
    ते म्हणाले, “भारतीय रीटेल क्षेत्रापुढे एकाच वेळी संधी आणि आव्हाने उभी आहेत. कोविड साथीनंतरच्या काळात वस्तूंच्या किंमती वाढल्या. मात्र त्या प्रमाणात सर्वसामान्यांचे उत्पन्न अथवा नोकरदारांचे पगार वाढलेले नाहीत. वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी लोक दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या वापरात कपात करु लागले आहेत ज्याचा परिणाम उत्पादनांचा खप कमी होण्यात दिसून येत आहे. सरकारने हे करांचे दर कमी करुन वैयक्तिक करदात्यांना दिलासा दिल्यास त्यांच्या मासिक उत्पन्नाचा अधिक भाग ते खरेदीवर खर्च करु शकतील आणि उत्पादनांचा खप पुन्हा वाढेल. त्याचवेळी रीटेल क्षेत्रातील व्यावसायिकांवरही उच्च करांचे दडपण असल्याने ते अडचणीत आले आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धा करणे कठीण होत आहे. म्हणूनच रीटेल क्षेत्र अर्थसंकल्पाकडे मोठ्या आशेने पाहात आहे.”
    ते पुढे म्हणाले, “भारतातील प्रचंड लोकसंख्येच्या तुलनेत तसेच रीटेल बाजारपेठही प्रचंड उलाढालीची असताना या क्षेत्रात व्यावसायिकांची संख्या अद्यापही पुरेशी नाही. त्यामुळे भारतीय परदेशात जाऊन व्यवसाय करतात पण देशात मात्र मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत नाही परदेशांच्या तुलनेत स्थानिक वेतनमानही आकर्षक नसते. यावर उपाय म्हणून सरकारने अनिवासी भारतीय व आंतरराष्ट्रीय व्यवसायांना भारतीय रीटेल क्षेत्रात आकर्षित करुन कर सवलती दिल्यास तसेच परकी थेट गुंतवणुकीस (एफडीआय) प्रोत्साहन दिल्यास येथे नव्या नोकऱ्या आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील, कर्मचाऱ्यांना चांगले वेतनही मिळेल आणि व्यावसायिकांची संख्या वाढल्यास स्पर्धात्मकतेमुळे वस्तूंच्या किंमती कमी होऊन सर्वसामान्यांना वस्तू स्वस्तात मिळतील. अनेक अनिवासी भारतीय जगभरात उत्तम व्यवसाय करतात, पण भारतात गुंतवणुकीस राजी होत नाहीत. हे चित्र बदलणे गरजेचे आहे.”
    भारतातील रीटेल क्षेत्रात प्रचंड सुप्त सामर्थ्य आहे आणि आगामी काळ भारतासाठी अत्यंत आश्वासक आहे, असे स्पष्ट करताना डॉ. दातार म्हणाले, की काही वर्षांपूर्वी भारत खरेदीदारांची बाजारपेठ (बायर्स मार्केट) होता तो आज विक्रेत्यांची बाजारपेठ (सेलर्स मार्केट) बनला आहे. जगातील अनेक देश भारतीय अन्नधान्य, कृषी व अन्य उत्पादने तसेच सेवांकडे डोळे लावून बसले आहेत. माझी कंपनी आखाती देशांच्या बाजारपेठांमध्ये रीटेल क्षेत्रात कार्यरत आहे आणि गेल्या वर्षी माझ्या कंपनीने उलाढालीत विक्रमी २५ टक्के वाढ मिळवली आहे. भारतीय उत्पादनांना बाहेरच्या देशांत किती मोठी मागणी आहे, याचे हे एक छोटेसे उदाहरण आहे. आपण या बाजारपेठेची परिसंस्था (इकोसिस्टिम) परिपूर्ण विकसित करु शकलो तर त्याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्था उद्दिष्टापेक्षा फार लवकर आर्थिक महासत्ता बनण्यात होईल.