द्वारकेत घराला भीषण आग, एकाच कुटुंबातील ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू

गुजरातमधील द्वारका येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. द्वारकेतील एका घराला अचानक आग लागली. सर्व सदस्य घरामध्येच असताना घराने पेट घेतला.

    गुजरात: गुजरातमधील द्वारका येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. द्वारकेतील एका घराला अचानक आग लागली. सर्व सदस्य घरामध्येच असताना घराने पेट घेतला. आगीचे स्वरुप मोठे असल्याने कुटुंबीयांचा जीव गुदमरू लागला. या घटनेत एका लहान बालकासह 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सर्वत्र या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.

    पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाची वाहने देखील घटनास्थळी दाखल झाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य रोड परिसरात रविवारी मध्यरात्री 3 च्या सुमारास ही घटना घडली. यावेळी कुटुंबातील ५ व्यक्ती घरामध्ये गाढ झोपेत होत्या. आग घराच्या पहिल्या मजल्यावर लागली होती. घरातील गाद्या आणि अन्य लाकडी सामान जळाल्याने मोठ्याप्रमाणावर धूर झाला होता. या धूरामुळे घरातील सर्वजण गुदमरू लागले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. घरातील एअरकंडीशन ओव्हर हिट झाल्याने आग लागली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमध्ये एक वृद्ध आजींचा जीव वाचला आहे. वृद्ध आजी या घरातील ग्राउंडफ्लोअरमध्ये असलेल्या खोलीत होत्या. खोलीमध्ये आजी देखील झोपल्या होत्या. त्यांचा या घटनेत जीव वाचला आहे. आगीचं ठोस कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.