पटना : प्रेमासाठी अनेकजण वाटेल ते करायला तयार असतात. मग ते चांगलं असो की वाईट तरीही ते करताना थोडाही विचार करत नाही. अशीच एक घटना नुकतीच घडली आहे. ज्यात तामिळनाडूतील एका तरुणाला त्याच्या मित्रांसह मुझफ्फरपूर पोलिसांनी पकडले आणि त्यानंतर त्याच्याकडून मिळालेली माहिती ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. आयआयटीचे (IITian) शिक्षण घेतलेल्या तरुणाने दुबईची (Dubai Job) नोकरी सोडून फक्त त्याच्या प्रेयसीला खूश करण्यासाठी असा काय प्रकार केला त्यानंतर त्याला थेट तुरुंगातच जावं लागलं.
हेमंत कुमार रघू असे या तरुणाचे नाव आहे. हेमंत रघू हा तामिळनाडूतील तिरुवल्लूर जिल्ह्यातील रहिवासी असून, त्याने आयआयटी मद्रासमधून केमिकल इंजिनिअरिंग केले आहे. तो दुबईत गलेलठ्ठ पगारावर काम करत असल्याचे सांगण्यात आले. हेमंत हा एका नाईट क्लब डान्सरच्या प्रेमात पडला आणि इथूनच खरी सुरुवात झाली त्याच्या उतरत्या क्रमाची. हेमंत रघू याने नोकरी सोडली आणि मैत्रिणीसह मुझफ्फरपूरला परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तो गुन्हेगारी कारवायामध्ये सक्रिय झाला.
एका महिलेकडून 2 लाख 20 हजार रुपये चोरल्याप्रकरणी मुझफ्फरपूर पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून शस्त्रे, दारूगोळा, दोन चोरीच्या मोटारसायकली आणि काही रोख रक्कमही जप्त केली.
पोलिसांनी रघूची चौकशी केली असता त्याने सांगितले की, ‘तो दुबईत एका एमएनसी कंपनीत काम करत होता. त्याचे जीवन सुखात सुरू होते. त्यानंतर त्याची तेथे एका नाईट क्लब डान्सरशी ओळख झाली. ती मुझफ्फरपूर बिहारमधील रहिवासी असून, तो तिच्या प्रेमात पडला. त्यानंतर तरुण नोकरी सोडून बिहारमध्ये आला आणि येथे चोरी करू लागला.