भारताच्या किनारपट्टीवर धडकणार दाना चक्रीवादळ (फोटो- istockphoto)
नवी दिल्ली: देशभरात सध्या परतीच्या पावसाचा प्रवास सुरू आहे. अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. देशातील अनेक राज्यात परतीच्या पावसाने चांगलीच हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. परतीचा पाऊस झोडपून काढत असतानाच आता अंदमानच्या समुद्रात तयार झालेले एक चक्रीवादळ भारताच्या किनारपट्टीवर धडक देणार आहे. उद्यापर्यंत हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात धडकणार आहे. येत्या एक दोन दिवसांत ते ओडीशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर येण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाला ‘दाना’ असे नाव देण्यात आले आहे.
हवामान खात्याने या चक्रीवादळाच्या लँडफॉलबद्दल माहिती दिलेली नाही. याचा फटका पुरीला बसण्याची शक्यता आहे. सौदी अरेबियाने या वादळाला ‘दाना’ असे नाव दिले आहे . उद्यापासून ओडीशा-पश्चिम बंगालच्या किनार पट्टीवर वाऱ्याचा वेग ० किमी प्रतितास इतका होण्याचा अंदाज आहे. जो २४ ऑक्टोबरच्या रात्रीपासून २५ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत जवळपास ताशी १२० किमी प्रतीतास होण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या माहितीनुसार चक्रीवादळ येण्याच्या एक दिवस आधीपासून मुसळधार पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे.
२४ ते २५ ऑक्टोबरच्या कालावधीत किनारपट्टीवर २० सेमी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ३० सेमी पेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. चक्रीवादळ येत असल्याने हवामान खात्याने २३ ऑक्टोबर २०२४ ते २६ ऑक्टोबर पर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला मच्छिमार बांधवांना दिला आहे. चक्रीवादळचा ३ राज्यांवर परिणाम पाहायला मिळणार आहे.
पश्चिम बंगालमधील कोलकाता, हवडा, हुगली, झारग्राम या ठिकाणी तसेच पूर्व मेदीनीपूर, दक्षिण २४ परगणा या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. २३ आणि २४ तारखेला या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर ओडीशा राज्यात पुरी, गुंजम, जगतसिंगपुर या जिल्ह्यात अत्यंत मुसळधार पावसासह वीजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे. तर आंध्र प्रदेश राज्यात देखील हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभगाने किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. तसेच स्थानिक व राज्य प्रशासन देखील या चक्रीवादळचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहे.