रांची : ईडीने झारखंडचे ग्रामीण विकासमंत्री आलमगीर आलम (Alamgir Alam) यांना अटक केली आहे. ईडीचे अधिकारी आलमगीर आलम यांचे सचिव संजीव कुमार लाल यांचा नोकर जहांगीर आलम याच्या फ्लॅटमधून 32 कोटी 20 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ग्रामीण विकास विभागातील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरु आहे.
आलमगीर आलम यांची ईडीने त्यांची चौकशी केली. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी या प्रकरणी चौकशीसाठी रांची येथील ईडी कार्यालयात मंत्री पोहोचले होते. काही तासांच्या चौकशीनंतर ईडीने ही अटकेची कारवाई केली आहे. राज्याच्या ग्रामीण विकास विभागातील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाची ईडी चौकशी करत आहे. एजन्सीच्या किमान सात पथकांनी हा छापा टाकला होता. यामध्ये मोठी रक्कम जप्त करण्यात आली.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रांची पहारीजवळील जहांगीर आलमच्या घरातून ही रक्कम जप्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात वरिष्ठ नोकरशहा आणि राजकारण्यांची नावे समोर आली आहेत, ज्याची चौकशी सुरू आहे. मंगळवारी नऊ तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर ईडी कार्यालयातून बाहेर आलेल्या आलमगीर यांनी सांगितले होते की, मला जे काही प्रश्न विचारण्यात आले त्याची मी उत्तरे दिली आहेत.
35.23 कोटी जप्तीनंतर ईडीने आलमगीर आलम यांना 14 मे रोजी रांची विभागीय कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. आलमगीर यांना त्यांचे पीएस संजीव लाल यांच्या घरातील नोकराच्या फ्लॅटमधून मोठी रोकड जप्त केल्याप्रकरणी समन्स बजावण्यात आले होते.