नवी दिल्ली : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे (Karnataka Assembly Elections) बिगूल वाजले. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. कर्नाटकात ही निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून, राज्यातील 224 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. पण सत्ताधारी भाजपसह काँग्रेससाठी ही निवडणूक तशी सोपी दिसत नाही. कारण या पक्षांसमोर अनेक आव्हानं आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकात भारत जोडो यात्रा केली. या भारत जोडो यात्रेला मोठा पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे भाजपसह इतर पक्षांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. कर्नाटकची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचे दिग्गज नेतेही तीन महिन्यांपासून कर्नाटकात ठाण मांडून बसले आहेत. इतकेच नाहीतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: तीन महिन्यांत सातवेळा कर्नाटकचा दौरा केला. गृहमंत्री अमित शहा यांनीही 10 पेक्षा जास्त सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला.
भाजपसमोर आव्हाने कोणती?
– 2021 मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांच्याऐवजी बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. येडियुरप्पा यांच्या सांगण्यावरूनच बोम्मई यांना मुख्यमंत्री करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
– संघटना आणि सरकार यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे म्हटले जात आहे. हेच मोठे आव्हान आहे. भाजप हा पक्ष सरकार आणि संघटना यांच्यात समन्वय राखण्यासाठी ओळखला जातो. मात्र, कर्नाटकात याच्या उलट आहे. येथे सरकार आणि संघटना यांच्यात समन्वयाचा मोठा अभाव आहे. हे भाजपसमोर आव्हान बनले आहे.
– याशिवाय, कर्नाटकातील सत्ताधारी भाजप सरकारवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. भाजप आमदाराच्या मुलाला लाच घेताना नुकतेच रंगेहात पकडण्यात आले. आता याप्रकरणी भाजप आमदारालाही अटक करण्यात आली आहे. या मुद्द्यावरून विरोधकांकडून भाजपला घेरले जात आहे.
काँग्रेससमोर आव्हाने आहेत तरी कोणती?
– कर्नाटकात भाजपचे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी काँग्रेसच्या पाठिंब्यावर जेडीएसचे सरकार सत्तेवर होते. दक्षिण कर्नाटकातील हा संपूर्ण भाग वोक्कलिंगा समाजाचा बालेकिल्ला मानला जातो. जे मूळात जेडीएसशी संबंधित आहे. अशा स्थितीत जेडीएसचा वाटा मिळवण्यावर काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचे लक्ष लागले आहे.
– काँग्रेसने गेल्या सहा महिन्यांत कर्नाटकात पक्ष विस्तारासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. हे राहुल गांधी यांच्या रॅलीवरून दिसते. पण सध्या डी. के. शिवकुमार यांच्याशिवाय सर्व नेत्यांना एकत्र ठेवणारा नेता पक्षात नाही. त्याचा फटका काँग्रेसला कर्नाटकात बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
– पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासाठी ही निवडणूक ‘लिटमस टेस्ट’ आहे. खर्गे हेदेखील कर्नाटकचे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे विशेष जबाबदारी असणार आहे.