कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उद्या बुधवारी (10 मे) मतदान होणार आहे. तर 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अमित शहा म्हणाले की, मी कर्नाटकातील सर्व भागांचा दौरा केला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत सर्वच भागात भाजपकडे कल, उत्साह आणि पाठिंबा मोठा आहे. तेथे भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल, अशी अशा त्यांनी व्यक्त केली.
सर्वच पक्ष मतदानाच्या दिवसाची वाट पाहत आहेत
त्याचवेळी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी बेंगळुरूमध्ये सांगितले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर काही वर्षांत भारत महासत्ता बनला. भारत आता 5 व्या स्थानावर आहोत आणि पुढील 20-25 वर्षात आपण पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर असू. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी रोड शो आणि रॅली काढून राज्यातील परिस्थिती समजून घेतली. मला खात्री आहे की आम्ही निश्चितपणे 135 जागा जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला
सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे प्रमुख नेते गेल्या काही दिवसांपासून राज्यभर प्रचारात व्यस्त होते. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) हळूहळू सत्तापरिवर्तनाची 38 वर्षे जुनी परंपरा खंडित करून दक्षिण भारतातील आपला बालेकिल्ला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपकडून सत्ता हिसकावून घेण्यासाठी काँग्रेस जोरदार प्रयत्न करत आहे आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मुख्य विरोधी पक्ष म्हणून आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.
सरकारच्या योजनाचा प्रचार
माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली जनता दल (धर्मनिरपेक्ष) निवडणूक प्रचारात आपली सर्व शक्ती पणाला लावताना दिसला आणि तो (JD-S) निवडणुकीत ‘किंगमेकर’ नव्हे तर विजेता म्हणून उदयास येऊ इच्छित आहे. भाजपच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा, ‘डबल इंजिन’ सरकार, राष्ट्रीय समस्या आणि कार्यक्रम किंवा केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीवर भर होता. काँग्रेसने स्थानिक मुद्दे हाती घेतले असून सुरुवातीला निवडणूक प्रचाराची धुरा स्थानिक नेत्यांच्या हाती होती. तथापि, नंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांसारखे प्रमुख नेतेही निवडणूक प्रचारात सामील झाले.
मोदींच्या 18 जाहीर सभा
नुकतेच सोनिया गांधी यांनीही राज्यात एका निवडणूक रॅलीला संबोधित केले. JD(S) ने देखील निवडणूक प्रचारात स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य दिले आहे. त्यांचे नेते एचडी कुमारस्वामी यांच्यासोबत देवेगौडा यांनीही प्रचार केला. 29 एप्रिलपासून मोदींनी सुमारे 18 सार्वजनिक सभा आणि सहा रोड शो केले आहेत. 29 मार्च रोजी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वी, मोदींनी जानेवारीपासून सात वेळा राज्याचा दौरा केला आणि विविध सरकारी योजना आणि प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. तसेच शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी झालेल्या अनेक बैठकांना संबोधित केले.
भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार, मोदींच्या संपूर्ण राज्याच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे आणि मतदारांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. पक्षाच्या नेत्यांना आशा आहे की मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह पक्षाच्या इतर नेत्यांच्या झंझावाती निवडणूक प्रचाराचा फायदा होईल. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, “पंतप्रधान आणि शहा यांनी मतदानापूर्वी काँग्रेसला मागे ढकलले आहे.” निर्मला सीतारामन, एस जयशंकर, स्मृती इराणी, नितीन गडकरी यांच्यासह इतर मंत्रीही प्रचारासाठी राज्याच्या विविध भागांना भेट देत आहेत.
यावेळी पक्षाला जनादेशाची आशा आहे
2008 आणि 2018 च्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊनही भाजपला राज्यात स्वतःचे सरकार स्थापन करण्यात अडचणी आल्या. मात्र, यावेळी पक्षाला स्पष्ट जनादेशाची अपेक्षा आहे. पक्षाने किमान 150 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पण जर समतोल काँग्रेसच्या बाजूने झुकला तर ते काँग्रेससाठी मनोबल वाढवणारे ठरेल आणि त्यांच्या निवडणुकीतील शक्यता पुनरुज्जीवित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.
काँग्रेसचे 150 जागा जिंकण्याचे लक्ष्य
ही निवडणूक जिंकून काँग्रेसला या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या ‘निवडणूक यंत्रणा’चा मुकाबला करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करायचा आहे. प्रारंभी राज्याचे नेते सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्याभोवती केंद्रित असलेल्या काँग्रेसच्या प्रचाराचे नेतृत्व खर्गे यांनी केले होते आणि पक्षाचे सर्वोच्च नेते राहुल आणि प्रियंका यांच्या सहभागाने तयारीला बळकटी देण्यात आली होती. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचल्यानंतर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी हुबळी येथे पक्षाच्या जाहीर सभेला संबोधित केले. खरगे हे स्वतः राज्यातील कलबुर्गी जिल्ह्यातील असल्याने काँग्रेस अध्यक्षांसाठी ही निवडणूकही प्रतिष्ठेची आहे. काँग्रेस पक्षानेही 150 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.