बिश्नोई गँगचा मोस्ट वाँटेड 'भिंडा' यवतमाळमध्ये गजाआड, थेट अमेरिकेतून पैशांचा पुरवठा
डझनवर गंभीर गुन्हे दाखल असलेला आणि राजस्थान पोलिसांनी 25 हजारांचे बक्षीस शिरावर ठेवलेला लॉरेन्स बिश्नोई आणि बिन्नी गुज्जर गँगचा कुख्यात भिंडा याला गजाआड करण्यात आले. यवतमाळमध्ये जांब मार्गावर ही कारवाई करण्यात आली. भूपेंद्रसिंग ऊर्फ रघु उर्फ भिंडा असे अटकेतील लॉरेन्स बिश्नोई गँगच्या मोस्ट वाँटेड गुन्हेगाराचे नाव आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखा पोलिस पथकाकडून अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान शनिवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मनवर यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यामध्ये पंजाब राज्यातील रहिवासी असलेला एक व्यक्ती बनावट नाव धारण करून जांब मार्गावरील एका परिसरात भाड्याने राहत असल्याचे सांगण्यात आले. एवढेच नव्हे तर तो एमडी ड्रग्ज सेवन आणि विक्री करीत असल्याचेही सांगण्यात आले. त्यावरून एपीआय मनवर यांनी ही माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश चवरे यांना दिली. आरोपी भिंडा याला शिताफीने ताब्यात घेतलं.
पोलिस पथकाने कसून चौकशी केली. त्यामध्ये त्याने स्वतःचे खरे नाव उघड केले. एवढेच नव्हे तर लॉरेन्स बिश्नोई आणि बिन्नी गुज्जर गँगचा सदस्य असल्याचेही स्पष्ट केले. त्यानंतर पोलिसांनी राजस्थान व पंजाब पोलिसांशी संपर्क साधला. तेव्हा दोन्ही राज्यात त्याच्या शिरावर खून, खुनाचा प्रयत्न असे डझनावर गंभीर गुन्हे असल्याचे पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. शिवाय राजस्थान पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यावरून राजस्थान पोलिसांचे पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी यवतमाळात दाखल झाले होते.
राजस्थान राज्यातील बाडमेर जिल्ह्यात भिंडा याच्याविरुद्ध विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. शिवाय त्याला एका खून प्रकरणात न्यायालयाने 20 वर्ष आणि खुनाच्या प्रयत्नात दहा वर्ष अशी एकूण 30 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. मात्र पॅरोलवर कारागृहातून बाहेर पडताच तो तेथून पसार होत यवतमाळ जिल्ह्यात वास्तव्याला आल्याचे तपासात पुढे आले आहे.
शिवसृष्टीच्या फलकावर लघुशंका, शिवभक्तांमध्ये प्रचंड संताप; दाम्पत्याला ठोकल्या बेड्या
लॉरेन्स गँगचा मोस्ट वाँटेड सदस्य आणि काँट्रॅक्ट किलिंग व खंडणी वसुलीत मास्टरमाइंड असलेला भिंडा हा लॉरेन्स गँगच्या सौरव गुज्जर, बिल्लु गुज्जर, गोल्डी ब्रार यांच्या संपर्कात होता. त्याला पंजाब आणि राजस्थान राज्यातून पसार झाल्यानंतर ओळख लपवून राहण्यासाठी व वास्तव्यासाठी संबंधित तिघेजण महिन्याला 20 ते 25 हजार रुपये डॉलरच्या माध्यमातून पुरवायचे, अशी माहितीही यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली.