मोठी बातमी ! अरविंद केजरीवाल यांना अखेर जामीन मंजूर, प्रचाराचा धडाका करणार सुरु

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे.

    दिल्ली : दिल्लीसह देशभरातील राजकारणामध्ये मोठा बदल करणारी बातमी समोर येत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली होती. पन्नास दिवसांच्या कोठडीनंतर अखेर अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला आहे. जामीनावर सुटका झाल्यानंतर अरविंद केजरीवाल प्रचाराचा धडाका सुरु करणार आहेत.

    मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रीय राजकारणामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची चर्चा रंगली होती. लोकसभा निवडणूकीचे तीन टप्पे पार पडलेले असताना आप प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मिळालेले जामीन इंडिया आघाडीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अरविंद केजरीवाल यांना सुप्रिम कोर्टामध्ये अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. 1 जूनपर्यंत अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यात आलेला आहे.

    केजरीवाल यांना ईडीकडून करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली. निवडणुकीच्या आधीच अटकेची कारवाई कशासाठी? कारवाई आणि अटकेत इतकं अंतर का? असे अनेक प्रश्न कोर्टाने ईडीला विचारले. निवडणूक प्रचारासाठी 22 दिवसांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

    अंतरिम जामीन देताना अरविंद केजरीवाल यांची तुरुंगातून सुटका होणार असली तरी केवळ प्रचारात सहभागी होऊ शकतील. मात्र मुख्यमंत्री म्हणून त्यांना कारभार पाहता येणार नाही. इंडिया आघाडीसाठी अरविंद केजरीवाल यांना प्रचारासाठी मिळालेला अंतरिम जामीन उरलेल्या चार टप्प्यातील मतदान आणि प्रचारासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे एनडीए आघाडीची चिंता वाढली आहे.