फोटो - टीम नवराष्ट्र
नवी दिल्ली : सध्या देशाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन असल्यामुळे जोरदार खडाजंगी होताना दिसत आहे. दरम्यान, विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. यानंतर भाजपच्या हिमाचलमधील मंडीच्या खासदार कंगना राणौत यांनी खळबळजनक विधान केले आहे. राहुल गांधी यांची ड्रग्ज टेस्ट करा अशी मागणी कंगना राणौत यांनी केली आहे.
बॉलीवुडमध्ये अभिनेत्री, निर्माती असे काम केल्यानंतर कंगना राणौत हिने आपला मोर्चा राजकारणाकडे वळवला आहे. यापूर्वी देखील अनेक वादग्रस्त विधानांमुळे चर्चांना उधाण आले आहे. यानंतर आता कंगना राणौत यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. लोकसभेमध्ये आजचे चक्रव्यूह हे पद्मव्यूह हा मुद्दा गाजला आहे. तसेच सत्ताधारी खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांची जात विचारल्यामुळे गदारोळ निर्माण झालेला आहे. अशा अनेक मुद्द्यांवर लोकसभेचे अधिवेशन गाजत आहे. दरम्यान, कंगना राणौत यांनी राहुल गांधीबाबत वादग्रस्त विधान केले.
काय म्हणाल्या कंगना राणौत?
खासदार कंगना राणौत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खासदार कंगना राणौत म्हणाल्या, काल संसदेतही एक कॉमेडी शो झाला होता. राहुल गांधींमध्ये प्रतिष्ठा नाही. काल संसदेत पोहोचल्यानंतर ज्या अवस्थेत ते असभ्य बोलतात ते पाहून मला आश्चर्य वाटले. राहुल गांधी संसदेत ज्याप्रकारे बोलतात त्यावरून त्यांची ड्रग टेस्ट व्हायला पाहिजे. त्यांच्याकडे पाहून ते नेहमीच नशेमध्ये असतात असे वाटते. त्यांच्या वक्तव्यावरून आता मला असे वाटते की त्यांची ड्रग्ज टेस्ट झालीच पाहिजे. एक तर दारुच्या नशेत होते किंवा ड्रग्जच्या नशेत होते. राहुल गांधी नेहमीच संविधानाला हानी पोहोचवतात. ते लोकसभेत फालतू बडबड करतात, असे घणाघाती वक्तव्य कंगना राणौत यांनी केले आहे.
सोशल मीडियावर कंगना राणौत यांचे राहुल गांधी बाबतचे वक्तव्य चर्चेचा विषय ठरला आहे. राहुल गांधींच्या समर्थकांनी कंगनाला खडेबोल देखील सुनावले आहेत. पुढे कंगना राणौत म्हणाल्या की, शात लोकशाही आहे. यामध्ये पंतप्रधानांची निवड लोकशाही पद्धतीने केली जाते. राहुल दररोज असे बोलून संविधानाला हानी पोहचवत आहे. आता पंतप्रधानांची निवड वय आणि लिंगाच्या आधारे होणार का? उद्या राहुल गांधी म्हणतील की त्वचेच्या रंगाच्या आधारे पंतप्रधानांची निवड केली जाईल. त्यांना लोकशाहीचा आदर नाही का? असा सवाल अभिनेत्री व खासदार कंगना राणौत यांनी उपस्थित केला.