अंत्यसंस्कारावरून भावांमध्ये भांडण, मोठ्या भावाने मागितला वडिलांच्या मृतदेहाचा अर्धा हिस्सा
मध्य प्रदेशातील टिकमगढ जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांच्या अंत्यसंस्कारावरून दोन भावांमध्ये वाद इतका वाढला की मोठ्या भावाने चक्क वडिलांच्या मृतदेहाचा अर्धा भाग मागितला. हा प्रकार जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या लिधोराताल गावात घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८४ वर्षीय ध्यानी सिंह घोष हे बऱ्याच काळापासून आजारी होते आणि रविवारी त्यांचं निधन झालं. ते त्यांचा लहान मुलगा देशराजसोबत राहत होते. मोठा मुलगा किशनला वडिलांच्या मृत्यूची बातमी कळताच गावी पोहोचला. गावात पोहोचल्यावर, किशनने सांगितले की तो त्याच्या वडिलांचे अंतिम संस्कार करणार आहे, तर धाकटा मुलगा देशराजने दावा केला की त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्यानेच त्यांचे अंतिम संस्कार करावेत. या प्रकरणावरून दोन्ही भावांमध्ये जोरदार वाद सुरू झाला.
जेव्हा गावकऱ्यांनी प्रकरण चिघळत असल्याचे पाहिले तेव्हा त्यांनी पोलिसांना कळवले. जटारा पोलिस स्टेशनचे प्रभारी अरविंद सिंह डांगी म्हणाले की, जेव्हा पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना किशन दारूच्या नशेत असल्याचं निदर्शनास आलं आणि त्याने दोन्ही भाऊ अंतिम संस्कार करू शकतील यासाठी मृतदेहाचे अर्धे तुकडे करावे अशी वादग्रस्त मागणी केली.
पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि किशनला समजावण्याचा प्रयत्न केला. खूप प्रयत्नांनंतर, पोलिसांना त्याची समजूत काढण्यात यश आले आणि तो शांत झाला आणि तेथून निघून गेला. यानंतर, धाकटा मुलगा देशराजने वडिलांचे अंतिम संस्कार पूर्ण केले. ही घटना संपूर्ण गावात चर्चेचा विषय बनली. एक मुलगा आपल्या वडिलांच्या मृतदेहाचा हिस्सा मागूच कसा शकतो, याचं स्थानिकांना आश्चर्य वाटत आहे.