मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मंगळवारी मध्य प्रदेश दौऱ्यावर होता. एका खासगी संस्थेच्या कार्यक्रमाला तो इथं आला होता. इंदूर विमानतळावर उतरल्यानंतर सचिन रस्त्याने देवासला पोहोचला. तीथं आपलं मनोगत व्यक्त करताना सचिनने सांगितले की, ‘इथं 2300 मुले शिक्षण घेत आहेत, मी या संस्थेला मदत करत आहे. गरीब मुलांसाठी काहीतरी केले पाहिजे, असं वडिलांचं स्वप्न होतं. आज पप्पा आमच्यासोबत असते तर त्यांना खूप आनंद झाला असता.’
देवासनंतर सचिन सिहोरच्या सेवेनिया गावात पोहोचला. सचिन तेंडुलकर फाऊंडेशन या त्याच्या संस्थेच्या बाल आश्रय स्थान असलेल्या श्री रामकृष्ण विवेकानंद सेवा कुटीर विद्यालयाची त्यांने पाहणी केली. गरीब मुलांना इथं मोफत शिक्षण दिले जाते. तेंडुलकरने मुलांशी संवाद साधताना शाळेची पाहणी केली. यादरम्यान तो मुलांसोबत क्रिकेटही खेळला. यानंतर सचिन भोपाळला रवाना झाला.
सचिनची संस्था सचिन तेंडुलकर फाऊंडेशन ही गरीब मुलांच्या शिक्षणासाठी काम करते. देवास जिल्ह्यातील खाटेगाव येथील संदलपूर गावात कोलकाता येथील परिवार एज्युकेशन सोसायटी ही संस्थाही असेच काम करत आहे. सचिनचा हा दौरा केवळ गरीब मुलांच्या शिक्षणासाठी आहे. त्याच्यासोबत एक टीमही आहे, जी या भेटीचे शूटिंग करत आहे.