कॅप्टन पण बदलला अन् मैत्रीही; तामिळनाडूत भाजपची नवी रणनिती
तामिळनाडूमध्ये २०२६ मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. त्याचे वारे आतापासूनच वाहू लागले असून पक्षबांधणीचं कामही सुरू झालं आहे. दक्षिण भारतात विशेषत: तामिळनाडू आणि केरळमध्ये भाजपला अद्याप यश आलेलं नाही. त्यामुळे पक्षाने नवी रणनिती आखली असून नव्या अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्षपदाची कमान नयनार नागेंद्रन यांच्याकडे सोपवली आहे. तसंच भाजपचा जुना साथीदार अण्णाद्रमुकशी पुन्हा मैत्रीचा हात पुढे केला आहे.
नयनार नागेंथरान २०१७ मध्ये भाजपमध्ये सामील झाले. अलिकडेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रामेश्वरम भेटीदरम्यान त्यांची मंचावर उपस्थिती होती. तेव्हापासून भाजपच्या ‘दक्षिण मिशन’ची धुरा त्यांच्यावर येऊ शकते असं बोललं जात होतं, अखेर शुक्रवारी त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.नयनार नागेंद्रन यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. टी नगर येथील भाजपच्या राज्य मुख्यालय ‘कमलालयम’ येथे पोहोचून उमेदवारी अर्ज दाखल करणारे ते एकमेव उमेदवार होते. इतर कोणीही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने, नागेंद्रन यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
नयनार नागेंद्रन हे तमिळनाडूमधील तिरुनेलवेली मतदारसंघातील भारतीय जनता भाजपचे आमदार आहेत. सध्या ते भाजपचे राज्य उपाध्यक्ष होते. यापूर्वी नागेंद्रन अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (AIDMK)मध्ये होते. भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई, केंद्रीय मंत्री एल. मुरुगन, माजी केंद्रीय मंत्री पी. राधाकृष्णन आणि भाजप आमदार आणि महिला मोर्चाच्या अध्यक्षा वनथी श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदासाठी नैनर नागेंद्रन यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता.
राज्यात अजूनही पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या दिग्गज नेत्या आणि सुपर कॉप अन्नामलाई यांचे काय होईल? पण चेन्नईला पोहोचलेल्या अमित शहांनी चित्र भूमिका स्पष्ट केली. पक्ष संघटनेत अन्नामलाई यांना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी दिली जाईल, असे त्यांनी ट्विटमध्ये सूचित केले आहे. त्यामुळे त्या राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता आहे.
तामिळनाडूमध्ये भाजपचे अण्णाद्रमुकशी असलेले संबंध खूप जुने आहेत. तथापि, दोघांमधील अनुभवही कटू गोड असे राहिले आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात दोन्ही पक्षांमधील मैत्री शिगेला पोहोचली होती आणि त्याच काळात त्यातील दरी देखील स्पष्ट झाली. १९९८ मध्ये जयललीता यांच्या नेतृत्वाखाली एक युती स्थापन झाली. एकेकाळी या युतीने लोकसभेच्या ३९ पैकी ३० जागा जिंकल्या होत्या.
तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुक आणि भाजपमधील मैत्रीच्या चर्चा काही दिवसांपासून रंगल्या होत्या. गेल्या महिन्यात २५ मार्च रोजी पक्षाचे सरचिटणीस ई पलानीस्वामी दिल्लीला गेले आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. पक्षाचे खासदार एम. थंबीदुराई हे देखील त्यांच्यासोबत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूमधील युतीची रूपरेषा या बैठकीतच तयार करण्यात आली. अमित शहा यांनी शुक्रवारी त्याची औपचारिक घोषणा केली.
२०२१ च्या विधानसभा निवडणुका भाजप आणि अण्णाद्रमुक यांनी संयुक्तपणे लढवल्या होत्या. भाजपने ४ जागा जिंकल्या होत्या. अन्नामलाई भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर दोन्ही पक्षांमधील कटुता वाढू लागली. २१ सप्टेंबर २०२३ रोजी ही मैत्री तुटली. दोन्ही पक्षांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढल्या आणि त्यांना मोठा धक्का बसला. यातून धडा घेत, दोन्ही पक्षांनी आता हातमिळवणी केली आहे. भाजपने अन्नामलाई यांना तामिळनाडूतून बाहेर काढून आणि त्यांना राष्ट्रीय भूमिका देऊन एआयएडीएमकेला आरामदायी बनवण्याचा प्रयत्न केला आहे.