मोठी बातमी ! NEET परीक्षेबाबत केंद्र सरकारकडून महत्त्वपूर्ण घोषणा; आता NEET परीक्षा... (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट-यूजी’ ही पुढील वर्षी म्हणजेच २०२७ पासून पूर्णपणे ऑनलाईन असेल. अर्थात जेईई मेनप्रमाणे ती देखील संगणकावर घेतली जाईल. ‘नीट‘मध्ये ‘ओएमआर’ शीट्सचा वापर पूर्णपणे बंद केला जाईल. पेपरफुटीच्या निषेधार्थ केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही घोषणा केली. परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. परीक्षेतील गैरप्रकारांची चौकशी सुरूच राहणार असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संगणकावर आधारित परीक्षा लागू झाल्याने परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होईल, असा सरकारचा विश्वास आहे. उल्लेखनीय आहे की, नीट-यूजी २०२६ ची परीक्षा ३ मे रोजी घेण्यात आली होती. मात्र, पेपरफुटीमुळे तो रद्द करण्यात आला. यानंतर २१ जून रोजी लष्कराच्या मदतीने हे आयोजन करण्यात आले होते. नीट पेपर लीक आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत दिल्लीच्या जंतरमंतरसह देशातील अनेक भागात निदर्शने होत आहेत.
दरम्यान, ‘नीट ‘मध्ये २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. फक्त ‘नीट’द्वारे, एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस यासह देशातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो. अनेक राज्यांमध्ये बी. एससी नर्सिंगसाठी नीट-यूजी स्कोअर देखील घेतला जातो.
विद्यार्थ्यांना सीबीटीचा सराव करावा लागेल
सीबीटी (कॉम्प्युटर बेस्ट टेस्ट) मोड लागू केल्यानंतर, नीट-२०२७ उमेदवारांना कॉम्प्युटरवर परीक्षा देण्याची सवय लावावी लागेल. तज्ज्ञांच्या मते, विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन मॉक टेस्टद्वारे स्क्रीनवर प्रश्न सोडवण्याची गती, अचूकता आणि क्षमता विकसित करावी लागणार आहे. या बदलामुळे ओएमआर शीटवर सराव करण्याऐवजी डिजिटल चाचणी सराव अधिक महत्त्वाचा होणार आहे. परीक्षेतील गैरप्रकारांवर बोलताना शिक्षणमंत्री म्हणाले की, सरकार याप्रकरणी पूर्ण कडक भूमिका घेईल.
बारामतीची श्रावणी कुदळे नीट परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम
राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेत(नीट) बारामती येथील श्रावणी कृष्णकांत कुदळे हिने ७२० पैकी ७१० गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला असून संपूर्ण देशात पाचवा रँक तर मुलींमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ओबीसी प्रवर्गामध्ये संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.






