बिहारमधील महागठबंधन सरकार कोसळलं; नितीश कुमार यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; आता ‘इंडिया’तूनही बाहेर पडणार

नितीश कुमार (Bihar Politics) यांनी राष्ट्रीय जनता दलासोबतच्या महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा नितीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे.

    पटणा : नितीश कुमार (Bihar Politics) यांनी राष्ट्रीय जनता दलासोबतच्या महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा नितीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे. बिहारमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला.

    नितीशकुमार यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय गोंधळ आणखी वाढला आहे. आज संध्याकाळी नितीश कुमार नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यासोबतच राज्यातील उपमुख्यमंत्र्यांचा चेहराही समोर येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिराग पासवान यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची कमान दिली जाऊ शकते. यादरम्यान नितीश यांनी भाजपला पाठिंब्याचे पत्र देऊन राज्यात सरकार स्थापनेची चर्चा केली आहे. आज सायंकाळच्या दरम्यान नितीश कुमार नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, असे मानले जात आहे.

    माझा राजीनामा राज्यपालांकडे

    ”आज मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे आणि राज्यपालांना राज्यातील सरकार बरखास्त करण्यास सांगितले आहे. सर्व काही बरोबर नसल्यामुळे ही परिस्थिती आली…मला प्रत्येकाकडून विचारणा होत होती. मी त्यांचे सर्व ऐकले. आज सरकार विसर्जित झाले आहे”, असे ते म्हणाले.