अहमदाबाद : क्षत्रिय समाजाचा अपमान केल्याच्या आरोपानंतर केंद्रीय मंत्री आणि गुजरातमधील राजकोट येथील भाजपचे लोकसभा उमेदवार पुरुषोत्तमसिंह रुपाला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार प्राप्त होताच आयोगाने अहवाल मागितला असून, रुपाला यांच्या कृतीमुळे सौराष्ट्रमधील क्षत्रिय समाजात असंतोष पसरला आहे.
यानंतर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील राजकोटमध्ये दाखल झाले असून, ते क्षत्रिय समाजाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. दरम्यान, नयनाबा जडेजा यांनी रुपाला यांच्या वक्तव्यामुळे क्षत्रिय समाजाच्या भावना दुखावल्या असून, या मुद्यावर एक-दोन संघटनांची बैठक व्हायला नको असे स्पष्ट केले.
करणी सेना आक्रमक
रुपाला यांनी गेल्या 22 मार्च रोजी केलेल्या वक्तव्यामुळे वाद उद्भवला आहे. इंग्रजांसमोर क्षत्रिय नतमस्तक झाले असे ते म्हणाले होते. याउलट दलित मात्र अडून होते ते कधीच झुकले नाही, असेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याविरोधात करणीसेनेसह अन्य क्षत्रिय संघटनांनी आघाडी उघडली होती.