पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार दौरा करत समस्तीपूर येथे ओबीसी आरक्षणावर भाष्य केले (फोटो - एक्स)
Bihar Elections 2025: बिहार : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची (Bihar elections) रणधुमाळी सुरु आहे. जोरदार प्रचार सुरु असून राजकीय आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बिहारच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदी हे आज (दि.24) बिहारच्या दौऱ्यावर असून समस्तीपूरमध्ये त्यांनी पहिली प्रचारसभा घेतली आहे. पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) पहिल्याच प्रचारसभेमध्ये ओबीसी समाजाचा उल्लेख करत जातीय राजकारणाला हात घातला.
बिहारमध्ये निवडणूका आणि मुख्यमंत्रीपद हे जातीय समीकरणावर आधारित असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये याचा आवर्जुन उल्लेख केल्याचे आढळून येते. समस्तीपूर येथील सभेमध्ये पंतप्रधान मोदी खास पगडीमध्ये दिसून आले. तसेच भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी ओबीसी असल्याचा उल्लेख केला. त्यांनी स्वतःला तसेच नितीश कुमार आणि केंद्रीय मंत्री रामनाथ ठाकूर यांचा उल्लेख इतर मागासवर्गीय असा केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भाषणादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भारतरत्न जननायक कर्पुरी ठाकूर यांना कर्पुरी गावात आदरांजली वाहण्याची संधी मला मिळाली. माझ्यासारखे, नितीश कुमार आणि रामनाथ ठाकूर सारखे मागास आणि गरीब कुटुंबातून आलेले लोक आज व्यासपीठावर उभे आहेत हे त्यांचे आशीर्वाद आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात सामाजिक न्याय आणण्यात आणि गरीब आणि उपेक्षितांना नवीन संधींशी जोडण्यात जननायक कर्पुरी ठाकूर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ते भारतमातेचे एक मौल्यवान रत्न होते. त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याचा मान आमच्या सरकारला मिळाला. हा आमच्यासाठी सन्मान आहे. आमचे सरकार भारतरत्न जननायक कर्पुरी ठाकूर यांना प्रेरणास्त्रोत मानते. आम्ही या संकल्पाने पुढे गेलो आहोत: वंचितांना प्राधान्य देणे, मागासांना प्राधान्य देणे आणि गरिबांची सेवा करणे.” असा उल्लेख पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये केला.
ही गरिबांची सेवा आहे की नाही?
गरिबांना कायमस्वरूपी घर देणे ही गरिबांची सेवा आहे की नाही असा प्रश्न पंतप्रधानांनी उपस्थितांना विचारला. “गरिबांना मोफत अन्नधान्य देणे ही गरिबांची सेवा आहे की नाही? एनडीए सरकार मोफत वैद्यकीय उपचार, शौचालये, नळाचे पाणी आणि सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक सुविधा पुरवत आहे. भाजप-एनडीएने कर्पूरी बाबूंनी दाखवलेल्या सामाजिक न्यायाच्या मार्गाला सुशासनाचा आधार बनवले आहे. आम्ही गरीब, दलित, महादलित, मागास आणि अति मागासवर्गीयांच्या हितांना प्राधान्य दिले आहे. आमच्या सरकारनेच सामान्य वर्गातील गरिबांनाही १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे,” असा देखील दावा नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
बिहार इलेक्शनच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
कॉंग्रेस काय करतं तुम्हाला माहिती…
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरक्षणाचा उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, “भाजप सरकारनेच अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षण आणखी १० वर्षांसाठी वाढवले आहे. पूर्वी, वैद्यकीय शिक्षणासाठी अखिल भारतीय कोट्यात मागास आणि गरिबांना आरक्षण दिले जात नव्हते. संविधानाने लोकांना दिशाभूल करणाऱ्यांच्या राजवटीत हे फायदे नाकारले जात होते; एनडीए सरकारने ही तरतूद केली. ओबीसी आयोगाला संवैधानिक संस्था बनवण्याची मागणी अनेक दशकांपासून सुरू होती आणि एनडीए सरकारने ही मागणी पूर्ण केली. कर्पूरी बाबू हे मातृभाषेत शिक्षणाचे कट्टर समर्थक होते. एनडीए सरकारने नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात स्थानिक भाषेत शिक्षणावर भर दिला आहे. आता, गरीब आणि वंचितांची मुले देखील त्यांच्या स्वतःच्या भाषेत शिक्षण घेऊ शकतात आणि परीक्षा देऊ शकतात. दुसरीकडे, आरजेडी आणि काँग्रेस काय म्हणत आहेत आणि करत आहेत हे तुम्हाला आमच्यापेक्षा चांगले माहिती आहे,” असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या बिहारमधील भाषणामध्ये विरोधकांना लगावला.






