लाल किल्ला बॉम्बस्फोटनंतर PM नरेंद्र मोदी यांनी तातडीने दिल्लीमध्ये CCS बैठक बोलावली (फोटो - सोशल मीडिया)
PM Modi CCS meeting: नवी दिल्ली : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरामध्ये सोमवारी (दि.10) भीषण स्फोट झाला. या प्रकरणाची चौफेर आणि चौकस चौकशी केली जात आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून यामध्ये देशातील काही डॉक्टरांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जैश-ए-मोहम्मदचे कमांडर यांना अटक करण्यात आली आहे. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीमध्ये बैठक पार पडली आहे. या बैठकीमुळे पाकिस्तानची धाकधुक वाढली आहे.
दिल्ली बॉम्बस्फोटानंतरच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची (CCS) एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या उच्चस्तरीय बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल उपस्थित राहणार आहेत. लाल किल्ल्यावरील कार बॉम्बस्फोटाची चौकशी वेगाने सुरू आहे आणि या बैठकीत आतापर्यंतच्या तपास अहवालावर, सुरक्षा संस्थांकडून मिळालेल्या माहितीवर आणि भविष्यातील रणनीतींवर चर्चा केली जाईल.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूतान दौऱ्यावर गेले होते. देशाच्या राजधानीवर हल्ला झाल्यानंतरही पंतप्रधान पूर्वनियोजित दौऱ्यावर गेल्याने विरोधकांनी टीकेची झोड उठवली. मात्र आता भूतानहून परतल्यानंतर, पंतप्रधान मोदी यांनी जखमींना भेटण्यासाठी LNJP रुग्णालयात भेट दिली आणि त्यांना न्यायाचे आश्वासन दिले. आता CCS बैठकीतून असे दिसून येते की केंद्र सरकार या दहशतवादी हल्ल्यामागील सत्य उघड करण्यासाठी आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. हल्ल्यामागील संभाव्य आंतरराष्ट्रीय नेटवर्कची चौकशी करण्याचे निर्देश सुरक्षा संस्थांना देखील दिले जाऊ शकतात.
जम्मू आणि काश्मीरमध्ये अलर्ट जारी
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर, जम्मू आणि काश्मीरमधील सर्व प्रमुख प्रतिष्ठानांवर सुरक्षा कडक करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय सीमा आणि लगतच्या भागातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. बीएसएफ आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
जम्मू विभागाचे पोलिस महानिरीक्षक भीमसेन तुती सोमवारी संध्याकाळी उशिरा कठुआच्या हिरानगर सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेचा आढावा घेण्यासाठी पोहोचले. तपासणीदरम्यान त्यांनी अनेक सीमा पोलिस चौक्यांची पाहणी केली आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. सीमेपलीकडून घुसखोरीचा धोका लक्षात घेता, सुरक्षा संस्था कोणत्याही चुका होऊ नयेत याची खात्री करण्यासाठी कटिबद्ध आहेत.
ऑपरेशन सिंदूर सुरू केले जाईल का?
जर तपासात लष्कर-ए-तैयबा किंवा जैश-ए-मोहम्मदचा सहभाग सिद्ध झाला तर भारत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर प्रत्युत्तर देऊ शकतो. सरकारने आधीच स्पष्ट केले आहे की देशातील कोणताही दहशतवादी हल्ला आता युद्धाचा गुन्हा मानला जाईल. ऑपरेशन सिंदूरनंतर, जैश आणि लष्करचे अनेक छावण्या भारतीय सीमेपासून सुमारे 350 किलोमीटर अंतरावर असलेल्या पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रदेशात स्थलांतरित करण्यात आल्याचे वृत्त आहे. हवाई दल प्रमुखांनी अलिकडेच सांगितले की, “कोणताही दहशतवादी तळ आमच्या आवाक्याबाहेर नाही.” त्यामुळे पाकिस्तानची भंबेरी उडाली आहे.






