महिन्याच्या सुरुवातीलाच वाढले LPG गॅस सिलेंडरचे दर, दिल्लीसह मुंबईतही किंमत किती?

आधीपासूनच महागाईच्या गर्तेत अडकलेल्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका. एलपीजीच्या दरांमध्ये वाढ, पाहा कोणत्या शहरात किती रुपयांनी दर वाढले?

    मुंबई :  2023 वर्ष संपायला आलं आहे आणि आज वर्षाच्या शेवटच्या महिन्याच्या सुरुवातीला सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. आजपासून म्हणजे 1 डिसेंबरपासून एलपीजी सिलेंडर (LPG Cylinder Price)  महाग झाला आहे. मात्र ही वाढ व्यावसायिक सिंलेडरमध्ये करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी  सिलेंडरच्या किमतींत 41 रुपयांनी वाढ केली आहे. जाणून घ्या देशातील महत्त्वाच्या शहरातील सिलेंडरची किंमत काय आहे.

    देशाच्या राजधानीसह मोठ्या शहरात किती किमंत?

    वाढलेल्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतींबाबत IOCL या वेबसाईटवर माहिती देण्यात आली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये एका एलपीजी सिलिंडरची किंमत 1796.50 रुपये झाली आहे. तर देशाची आर्थित राजधानी मुंबईमध्ये ही किंमत 1749.00 इतकी झाली आहे, जी आधी 1728.00 होती. चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलेंडरसाठी 1942.00 रुपयांऐवजी 1968.50 रुपये मोजावे लागतील. तर कोलकातामध्ये त्याची किंमत 1885.50 रुपयांवरून 1908.00 रुपये करण्यात आली आहे.

    घरगुती सिलेंडरच्या किमतींमध्ये काही बदल?

    एकीकडे व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींमध्ये सातत्यानं बदल पाहायला मिळत आहेत. तर तेल कंपन्यांनी 14 किलोग्रॅम वजनाच्या घरगुती सिलेंडच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. IOCL च्या अधिकृत वेबसाईटवर नमूद करण्यात आल्यानुसार, दिल्लीत घरगुती सिलेंडर 9.3 रुपयांना, कोलकात्यात 929 रुपयांना, मुंबईत 902.50 रुपयांना आणि चेन्नईत 918.50 रुपयांना उपलब्ध आहे.