"मी संसदेत ओरडण्यासाठी आणि शिवीगाळ...," राघव चड्ढा यांचा 'आप'वर पलटवार
आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांना नुकतेच राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवण्यात आले. या कारवाईसंदर्भात पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर विविध आरोप केले, ज्यात ते पक्षाच्या धोरणाबाहेर जाऊन वागत असल्याचा आरोप करण्यात आला. महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारला विरोध न केल्याचा आणि सभात्यागादरम्यान संसद न सोडल्याचाही त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. यानंतर, राघव चड्ढा यांनी शनिवारी दुपारी सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर करून, आपल्यावर उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देत पक्षाला प्रत्युत्तर दिले.
राघव चड्ढा म्हणाले, “मी संसदेत ओरडण्यासाठी किंवा शिवीगाळ करण्यासाठी गेलो नव्हतो. मी सामान्य लोकांशी संबंधित मुद्दे मांडले.” ते पुढे म्हणाले, “मी विरोधी सदस्यांसोबत सभात्याग न केल्याचे एकही उदाहरण तुम्ही दाखवून द्या.” संसदेत कॅमेरे लावलेले आहेत, तुम्ही कॅमेरा बाहेर काढा आणि दाखवा.
विरोधी पक्षाच्या सभात्यागादरम्यान आपण तिथे बसलो होतो, या आम आदमी पक्षाच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना चड्ढा म्हणाले, “हे धादांत खोटं आहे.” विरोधी पक्षाने सभात्याग केला असताना आपण त्याला पाठिंबा दिला नाही, असे एकही उदाहरण ‘आप’ने दाखवावे, अशी मागणी चड्ढा यांनी केली. संसदेत सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. सभात्यागादरम्यान राघव यांनी विरोधी पक्षाला पाठिंबा दिला नाही, हे ‘आप’ने फुटेज सादर करून दाखवावे.
मैं बोलना नहीं चाहता था, मगर चुप रहता तो बार-बार दोहराया गया झूठ भी सच लगने लगता। Three Allegations. Zero Truth. My Response: pic.twitter.com/tPdjp04TLt — Raghav Chadha (@raghav_chadha) April 4, 2026
हा आरोप धादांत खोटं असल्याचे सांगत, चड्ढा यांनी स्पष्ट केले की, आम आदमी पक्षाच्या कोणत्याही नेत्याने त्यांना औपचारिक किंवा अनौपचारिकरित्या ठरावावर सही करण्यास सांगितले नाही. चड्ढा यांनी सांगितले की, राज्यसभेत आम आदमी पक्षाचे एकूण १० खासदार आहेत आणि त्यापैकी ६-७ जणांनी स्वतः ठरावावर सही केली नाही. राघव चड्ढा म्हणाले की, राज्यसभेत हा ठराव मांडण्यासाठी केवळ ५० सह्यांची गरज आहे, तर विरोधी पक्षात १०५ खासदार आहेत.
आम आदमी पार्टीने (आप) राघव चड्ढा यांच्या जागी अशोक कुमार मित्तल यांची राज्यसभेतील पक्षाचे उपनेते म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान राघव चड्ढा यांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी म्हटले की, ते सातत्याने जनहिताचे मुद्दे मांडत आले आहेत आणि यामुळे आम आदमी पार्टीचे काय नुकसान झाले असेल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याला प्रत्युत्तर म्हणून, आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी व्हिडिओंची एक मालिका प्रसिद्ध करून राघव चड्ढा यांच्यावर पक्ष आणि राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर गप्प राहण्याचा आणि भाजपला घाबरण्याचा आरोप केला.






