सौजन्य - नवराष्ट्र टीम
वडगाव मावळ/ सतिश गाडे : मावळ तालुक्यातील पाटण गावात सोमवारी (६ जुलै) पहाटे मुसळधार पावसामुळे डोंगराचा मोठा भाग कोसळून एका घरावर दरड पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. मात्र, सतत सुरू असलेल्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत.
पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच मावळचे तहसीलदार, पोलीस, महसूल विभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी जेसीबी, उत्खनन यंत्रे आणि अत्याधुनिक शोध उपकरणांचा वापर केला जात आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) पुणे येथील पाचव्या बटालियनला पाचारण करण्यात आले आहे. निरीक्षक रविंदर यांच्या नेतृत्वाखाली आणि सहाय्यक कमांडंट चंद्रकेतू शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ३० सदस्यांचे विशेष पथक सकाळी ५.५० वाजता घटनास्थळी रवाना झाले. या पथकाकडे ढिगारा हटविण्यासाठी आवश्यक अत्याधुनिक उपकरणे, कटर, लाईफ डिटेक्शन उपकरणे आणि वैद्यकीय साहित्य उपलब्ध आहे.
सध्या घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सर्व यंत्रणा प्रयत्नशील आहेत. परिसरातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर मदतकार्यात सहभाग घेतला आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यात दरडी कोसळण्याच्या घटना वाढल्या असून, डोंगरपायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हे सुद्धा वाचा : मुसळधार पावसाचा रेल्वेला फटका; कर्जत-खोपोली लोकल सेवा ठप्प, इतर मार्गांवर विलंब
प्राथमिक माहितीनुसार, दरड कोसळण्याचे कारण अतिवृष्टीमुळे जमिनीत पाणी मुरून मातीचा आधार कमकुवत झाल्याचे मानले जात आहे. प्रशासनाकडून परिसरातील धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण सुरू असून, आवश्यकतेनुसार नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याची तयारी करण्यात आली आहे.






