उमरची दुसरी कार Eco Sport जप्त; संशयास्पद लाल कारबद्दल तपासात मोठे खुलासे
Delhi Car Blast News In Marathi: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवनवीन अपडेट समोर येत आहे. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूल उध्वस्त केल्यानंतर हा स्फोट झाला. स्फोटातील सूत्रधार डॉ. मोहम्मद उमरशी संबंधित अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्यांची चौकशी केली जात आहे. याचदरम्यान दिल्ली बॉम्बस्फोटांच्या तपासात एक महत्त्वाचा पुरावा समोर आला आहे. फरीदाबादमधील खंडावली गावाजवळ पोलिसांनी एक संशयास्पद लाल रंगाची इको स्पोर्ट्स कार (DL 10 CK 0458) जप्त केली आहे. फरीदाबाद पोलिसांनी या कारला ताब्यात घेतले आहे आणि ती फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली जात आहे. तपास यंत्रणा कारच्या मालकाचा आणि संभाव्य संशयितांचा शोध घेत आहेत.
फरिदाबाद पोलिसांनी दिल्ली स्फोट प्रकरणात संशयित असलेली लाल फोर्ड इकोस्पोर्ट कार, DL10CK0458 जप्त केली आहे. ही कार खंडावली गावाजवळ पार्क केलेली आढळली. ही कार उमर उन नबी उर्फ उमर मोहम्मद याच्या नावाने नोंदणीकृत आहे आणि खरेदीच्या वेळी त्याने बनावट पत्ता दिला होता. ही कार फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे.ही तीच कार आहे ज्याच्या नावावर दिल्ली पोलिसांनी अलर्ट जारी केला होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
कारला ताब्यात घेण्यात आले आहे आणि सध्या ती जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात येत आहे. दिल्ली पोलीस आणि इतर केंद्रीय एजन्सींना माहिती देण्यात आली आहे. ही कार २२ नोव्हेंबर २०१७ रोजी दिल्लीतील राजौरी गार्डन आरटीओमध्ये नोंदणीकृत होती. तपासात असे दिसून आले आहे की ही कार उमर उन नबी उर्फ उमर मोहम्मद याच्या नावाने खरेदी करण्यात आली होती. उमर हा दिल्ली बॉम्बस्फोटातील प्रमुख संशयितांपैकी एक आहे.
पोलिसांच्या मते, उमर मोहम्मदने कार खरेदी करताना बनावट पत्ता वापरला होता. कागदपत्रांवर त्याने ईशान्य दिल्लीतील एका घराचा पत्ता दिला होता. दिल्ली पोलिसांनी काल रात्री उशिरा त्याच पत्त्यावर छापा टाकला, परंतु तेथे कोणीही सापडले नाही. तपास यंत्रणा आता खंडावली गावात कार कोणी आणि कधी सोडली हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
मंगळवारी दिल्ली पोलिसांनी या लाल रंगाच्या इकोस्पोर्ट कारबाबत अलर्ट जारी केला. बॉम्बस्फोटाच्या दिवशी संशयितांसोबत ही कार असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यानंतर पाच पोलिस पथकांनी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात त्याचा शोध घेतला. फरिदाबाद पोलिसांनी कारवाई करत खंडावली गावाजवळ पार्क केलेली कार ताब्यात घेतली. आता वाहन जप्त करण्याची आणि फॉरेन्सिक तपासणी करण्याची तयारी सुरू आहे.
तपासात असे दिसून आले की ही फोर्ड इकोस्पोर्ट पूर्वी पंकज गुप्ता यांच्या नावावर नोंदणीकृत होती, तर सध्या ती उमर नबी यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. ही कार पंकजकडून उमरकडे कशी गेली आणि त्यादरम्यान इतर कोणत्याही व्यक्तींनी किंवा नेटवर्कने ती वापरली का याचा तपास पोलिस आता करत आहेत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.






