सकाळी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, दुपारी भाजपसोबत हातमिळवणी, संध्याकाळी पुन्हा शपथ; नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्रीपदी!

राजदबरोबर असलेल्या सत्तेतून राजीनामा देण्याची वेळ का आली? असा प्रश्न नितीश कुमारांना सकाळी विचारण्यात आला होता. त्यावर नितीश कुमार म्हणाले,राजदसोबत  राज्यकारभार योग्य रितीने चालत नव्हता, त्यामुळे माझ्यावर राजीनामा देण्याची वेळ आली.

  बिहारमध्ये कालपासून राजकीय वातावरण तापले होते. आज ९व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत नितीश कुमार यांनी राजकीय घडामोडींना पूर्णविराम दिला आहे. नितीश कुमार यांनी भारत माता की जय आणि जय श्री रामच्या घोषणा देत शपथ घेतली. तेव्हा जीतन राम मांझी, चिराग पासवान, सम्राट चौधरी, जेपी नड्डा उपस्थित होते. (Nitish Kumar takes oath as Bihar CM for the 9th time)
  या नेत्यांनीही घेतली शपथ 
  नितीश यांच्यासह जनता दल (युनायटेड) नेते विजय कुमार चौधरी आणि बिजेंद्र प्रसाद यादव आणि भाजप नेते सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे बिहारचे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिहारमधील बदललेल्या राजकीय समीकरणात नितीशकुमार यांना आता नवे मंत्रिमंडळ मिळणार असल्याने रातोरात आरजेडीचे मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर पडले आहेत.
  नितीश कुमारांनी राजीनामा का दिला?
  राजदबरोबर असलेल्या सत्तेतून राजीनामा देण्याची वेळ का आली? असा प्रश्न नितीश कुमारांना सकाळी विचारण्यात आला होता. त्यावर नितीश कुमार म्हणाले,राजदसोबत  राज्यकारभार योग्य रितीने चालत नव्हता, त्यामुळे माझ्यावर राजीनामा देण्याची वेळ आली. तुम्ही पत्रकारांनी मला यापूर्वी अनेकदा विचारल होतं. परंतु, तेव्हा मी बोलणं बंद केलं होतं. आम्ही सर्व परिस्थिती पाहत होतो. त्यानंतर मला लोक वेगवेगळे सल्ले देऊ लागले. मी माझ्या पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांचे वेगवेगळे सल्ले घेतले. त्यानंतर आज राजीनामा दिला आहे आणि आमचं सरकार विसर्जित केलं आहे.
  नितीश कुमार म्हणाले, आम्ही आधी भाजपाबरोबर युती केली होती. ती युती तोडून यांच्याबरोबर (राजद) आघाडी बनवली. परंतु, इथे येऊनही काही सुरळीत चालत नव्हतं. आमच्या लोकांना त्रास होत होता. ते मेहनत घेत होते. परंतु, काही गोष्टींचं त्यांना वाईट वाटत होतं. त्यामुळे मी या निर्णयापर्यंत पोहोचलो.
  दरम्यान, भाजपाने नितीश कुमार यांना पाठिंबा दिला. हा पाठिंबा मिळताच नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.