भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कधी मिळणार (फोटो- सोशल मीडिया/ani)
नवी दिल्ली: RSS Meeting in Delhi: भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक अजूनही पार पडलेली नाही. भाजपकहा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या जे.पी. नड्डा हेच सध्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळत आहेत. मात्र पक्षातील काही संघटनात्मक निवडणुका राहिल्याने अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर जात असल्याचे सांगितले जात आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी भाजपची राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दिल्लीत महत्वाची बैठक पार पडणार असल्याचे समजते आहे. सरसंघचालक मोहन भागवत या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे समोर आले आहे. दिल्लीत संघाच्या प्रांत प्रचारकांची बैठक होणार आहे. यामध्ये सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे देखील उपस्थित असण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक दिल्लीत होणार असून, यावर्षी संघाला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे. मात्र या बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वासही नवीन अध्यक्षाच्या निवडीवरून चर्चा करण्याची शक्यता आहे.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी जोरदार हालचाली; ‘या’ तारखेपर्यंत नवा अध्यक्ष मिळणार?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे नेतृत्व यांच्यात कोणाला अध्यक्ष करायचे यावरून सहमती होत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अध्यक्षाच्या निवडीला उशीर होत असल्याचा अंदाज आहे. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत.
जे.पी. नड्डा यांना पुन्हा निवडणूक न होताच अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवल्याने संघ नाराज असल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीत होणाऱ्या बैठकीत या विषयावर चर्चा झाल्यास लवकरच भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. भाजपमधील अनेक नेते जे.पी. नड्डा यांनाच अध्यक्ष कायम ठेवण्यासाठी आग्रही असल्याचे समजत आहे. तर संघ कदाचित याबाबतीत वेगळी भूमिका घेऊ शकतो.
सध्या भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत धर्मेंद्र प्रधान, विनोद तावडे, मनोहरलाल खट्टर, स्मृती इराणी यांचे नाव आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपच्या अध्यक्षपदासाथी तीन महिला नेत्यांची नवे देखील चर्चेत असल्याचे म्हटले जात आहे. कदाचित यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप मिळून वेगळी खेळी खेळू शकतात. महिला नेत्याला अध्यक्षपदी बसवेल जाऊ शकते. त्यामुळे दिल्लीत संघ आणि भाजपमध्ये चर्चा झाल्यास नेमकी राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आणि भाजपला नवीन अध्यक्ष कधी मिळणार याची स्पष्टता होण्याची शक्यता आहे.