Photo Credit -Social Media शरद पवार- अजित पवार पुन्हा एकत्र येणार; सुप्रिया सुळे निर्णय घेणार?
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या गटाने लक्षणीय यश मिळवले, तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला अपेक्षित यश मिळाले नाही. यानंतर दोन्ही गटांमधील संपर्क वाढू लागला असून, विविध कार्यक्रम आणि बैठकीत शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात जोर चढला आहे. विशेष म्हणजे, दोन्ही गटातील कार्यकर्त्यांकडूनही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकसंघ व्हावी, अशी मागणी उघडपणे व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर, शरद पवार यांनी एकत्र येण्याच्या शक्यतेबाबत सकारात्मक संकेत दिले असून, अंतिम निर्णय मात्र खासदार सुप्रिया सुळे घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज एका कार्यक्रमात एकाच मंचावर उपस्थित असल्याचे दृश्य पाहायला मिळाले. या प्रसंगी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “आम्ही एक कुटुंब आहोत आणि कुटुंब म्हणून एकत्रच आहोत. राजकारणात मतभेद असणे साहजिक असते, मात्र मनभेद नसावेत. आमचे आठही खासदार सक्षमपणे काम करत आहेत. ते पुढे काय निर्णय घेतात, ते पाहणे महत्त्वाचे आहे. कोणताही निर्णय घेताना सर्वांची एकत्रित चर्चा होईल. सध्या लग्न कोंढाण्याचं, त्यानंतर राष्ट्र, मग महाराष्ट्रावर निर्णय घेतला जाईल.”
India Vs Pakistan: देहुतील आम्युनेशन्स फॅक्टरीला मोठा बंदोबस्त; पोलीस यंत्रणा अलर्ट
तसेच, “माझी साहेबांशी भेट होणे गरजेचे आहे. जेव्हा ती भेट होईल, तेव्हा जयंत पाटील आणि साहेब यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल,” असे सुळे यांनी स्पष्ट केले. “सध्या देश सर्वात प्रथम आहे आणि त्यानंतरच पुढील निर्णय घेतले जातील,” असेही त्यांनी यावेळी नमुद केलं.
यासंदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले, भविष्यात पुन्हा एकत्र यायचं की नाही याचा निर्णयहा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या पिढीतील नेतृत्वाने घ्यायचा आहे. आता मी या निर्णय प्रक्रियेत काहीसा मागे सरकलो आहे. सध्या आमचेचे कार्यकर्ते आणि नेते जरी वेगवेगळ्या गटांत विभागले गेले असले, तरी आजही त्याची विचारसरणी एकच आहे. दिल्लीतील आमचे खासदार आजही एकसंध विचारांनी जोडलेले आहेत.
राज्यातील काही आमदारांना त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाणे गरजेचे वाटत आहे. पण या संदर्भात मी कोणताही निर्णय देणार नाही, त्यावर त्यांनीच एकत्र चर्चा करून तो ठरवायचे आहे. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकत्र येण्याबाबत विचारविनिमय करून निर्णय घ्यायचा आहे. पक्ष स्थापनेच्या काळात जे सहकारी माझ्यासोबत होते, तेच आज वेगवेगळ्या गटांत आहेत. तरीही त्यांच्या विचारसरणीत विशेष फरक पडलेला नाही. त्यामुळे भविष्यात हे सर्व नेते पुन्हा एकत्र आले, तरी मला त्यात काहीच नवल वाटणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
Ind vs Pak war : राम मंदिराबाबत आक्षेपार्ह विधान, पाकिस्तानच्या महिला नेत्याला Danish Kaneria चे चोख
साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 66व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार कुटुंब अनेक दिवसांनंतर एकाच मंचावर एकत्र पाहायला मिळाले. रयत शिक्षण संस्थेच्या या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार हे उपस्थित होते. या कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात मनमोकळ्या संवादासोबतच हास्यविनोदाचे क्षणही पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांच्या संबंधांमध्ये पुन्हा जवळीक निर्माण झाल्याची चर्चा राज्यभर रंगू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी दिलेलं विधान – “दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आले तर त्यात काहीही आश्चर्य वाटू नये” – विशेष लक्ष वेधून घेत आहे. त्यानंतर साताऱ्यातील या कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात झालेल्या आपुलकीच्या संवादामुळे, त्यांच्या मतभेदांवर पडदा टाकत नवे मनोमिलन झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.