मुंबई : मरीन ड्राईव्ह या मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीत असलेल्या सरकारी वसतीगृहात 6 जून रोजी 18 वर्षांच्या तरुणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला होता. ही तरुणी मुळची अकोल्याची रहिवासी होती. ती वांद्रा येथे कॉलेजमध्ये शिकत होती तसंच ती पार्ट टाईम नोकरीही करत होती. सावित्रीबाई फुले वसतीगृहात सापडलेल्या या तरुणीच्या मृतदेहानं खळबळ उडाली होती. या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला होता. याच बिल्डिंगचा सुरक्षा रक्ष असलेल्या ओमप्रकाश कनोजिया हा या प्रकरणातील संशयित आरोपी मानण्यात येत होता. मात्र हत्याकांड उघडकीस आल्यानंतर काही तासातच कनोजिया याचा मृतदेह चर्नी रोड स्टेशनजवळ रुळांवर सापडला. या प्रकारानंतर त्यानं आत्महत्या केल्याचं समोर आलंय. कनोजिया याचं वय 33 होतं आणि त्याचं लग्न झालेलं होतं. आता या तरुणीच्या मृतदेहाच्या पोस्ट्मार्टेममध्ये नवी माहिती समोर आली आहे.
त्या तरुणीवर बलात्कार झालाच नव्हता
तिचा मृतदेह सापडल्यानंतर तो पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला होता. आता त्याचा अहवाल समोर आला आहे. त्यात अनेक गोष्टींचा उलगडा झाल्य़ाचं सांगण्यात येतंय. या तरुणीवर बलात्कार झाल्याचा एकही पुरावा मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत आणखी काही चाचण्या घेण्यात येणार असल्याचंही सांगण्यात येतंय.
तरुणी घरी जाण्याच्या तयारीत होती
यापूर्वीही कनोजिया यानं या तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. या तरुणीनं आपल्या मैत्रिणीला ही घटना सांगितली होती. ही तरुणी 2 दिवसांनी तिच्या घरी जाणार होती, त्यासाठी तिनं तयारी सुरु केली होती, असंही सांगण्यात येतंय. संशयित आरोपी कनोजिया यानं तिच्यावर अतिप्रसंग केल्याचं मानण्यात येत होतं. मात्र पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये बलात्कार झाला नसल्याचं समोर आल्यानंतर आता या प्रकरणाचं गूढ आणखी वाढलं आहे.