राम मंदिरातील हिशेबाची SIT कडून पडताळणी; 124 कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह (Photo Credit : Social media)
अयोध्या : उत्तर प्रदेश सरकारच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) राम मंदिर ट्रस्टने गेल्या दोन वर्षांत विविध कार्यक्रमांवर केलेल्या 124 कोटींहून अधिक रुपयांच्या खर्चाची चौकशी सुरू केली आहे. सूत्रांनुसार, या चौकशीमध्ये जानेवारी 2024 मधील प्राण-प्रतिष्ठा सोहळा, 2025 च्या महाकुंभाची व्यवस्था आणि नोव्हेंबर २०२५ मधील ध्वजारोहण सोहळ्याचा समावेश आहे.
गेल्या दोन वर्षांतील आर्थिक नोंदी, बिले आणि देणगी म्हणून मिळालेल्या सोने-चांदीचे लेखापरीक्षण केले जात आहे. ट्रस्टच्या स्थापित आर्थिक कार्यपद्धती आणि मंजुरीनुसार निधीचा वापर झाला आहे की नाही, हे निश्चित करण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी लेखापरीक्षण अहवाल, पेमेंट व्हाउचर्स, बिले, चार्टर्ड अकाउंटंटच्या नोंदी आणि खर्चाची विवरणपत्रे तपासली आहेत. मात्र, चौकशी पूर्ण होईपर्यंत चंपत राय हे विश्व हिंदू परिषदेतील (विहिंप) आपल्या पदावर कायम राहतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.
राम मंदिर दान चोरी प्रकरणी ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्यांवर गंभीर आरोप झाले. या आरोपांप्रकरणी राय आणि मिश्रा यांनी राजीनामेदेखील दिले. त्यांच्या राजीनाम्यांनंतर अयोध्येतील वातावरण शांत होईल असे वाटत होते. परिस्थिती थोडी शांत झाली असतानाच, चंपत राय यांच्यामुळे पुन्हा एकदा वातावरण तापले.
‘प्राणप्रतिष्ठेवर 113 कोटी रुपये खर्च’
एसआयटीच्या तपासाअंतर्गत सर्वात मोठा खर्च २२ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर झाला आहे, ज्याला अंदाजे ८००० पाहुणे उपस्थित होते आणि त्यासाठी एकूण ११३ कोटी रुपये खर्च आला.
सोन्या-चांदीचीही जुळवणी केली जाईल
एसआयटी केवळ खर्चाचीच प्रत्यक्ष पडताळणी करत नाही, तर भक्तांनी रामलल्लाला दान केलेल्या मौल्यवान धातू आणि दागिन्यांच्या नोंदींचीही तपासणी करत आहे. ट्रस्टच्या नोंदीनुसार, नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान भक्तांनी २.३ किलो सोने आणि ८३.३ किलो चांदी दान केली. याव्यतिरिक्त, महाकुंभ मेळ्यादरम्यान १.५ किलो सोने आणि २८ किलो चांदी अर्पण म्हणून मिळाली होती, ज्याच्या साठवणुकीची आणि सद्यस्थितीची चौकशी सुरू आहे. तपास अधिकारी या देणग्यांशी संबंधित कागदपत्रांची पुन्हा तपासणी करत आहेत.
विश्वस्तांनी आवडत्या ‘चोरांची’ भरती केली
श्री राम जन्मभूमी मंदिरातील देणगी चोरी प्रकरणाच्या तपासातून सातत्याने नवनवीन आणि धक्कादायक तथ्ये समोर येत आहेत. देणगी मोजण्यासाठी नेमलेले कर्मचारी कागदोपत्री वाराणसीस्थित ‘सैनिक सिक्युरिटी सर्व्हिसेस’ या कंपनीने नेमले असले तरी, त्यांची शिफारस थेट राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांनी केली होती आणि अंतिम मंजुरी बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. तपास यंत्रणा आता या निष्कर्षावर पोहोचत आहेत की, देणगीचा अपहार करण्याची ही योजना पूर्वनियोजित होती.
Ram mandir Donation Scam : क्लीनचीटनंतर चंपत राय यांचा खळबळजनक गौप्यस्फोट






