लखनौ : गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. लोक क्षुल्लक कारणांवरुनही हत्या आणि मारामारी करत असल्याच्या अनेक घटना समोर येतात. अशीच एक हादरवणारी घटना आता समोर आली आहे. यात एका हवालदाराने गोळी मारून शिक्षकाची हत्या केली. यूपीच्या मुझफ्फरनगरमध्ये एका हवालदाराने शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली.
हवालदाराने सरकारी कार्बाइनने शिक्षकावर गोळी झाडली. घटनेच्या वेळी हवालदाराने आणि शिक्षक एकाच वाहनातून प्रवास करत होते. यूपी बोर्ड हायस्कूल परीक्षेची प्रती घेऊन ते वाराणसीहून मुझफ्फरनगरला आले होते. त्यानंतर वाहनात दोघांमध्ये वाद झाला, त्यातूनच हवालदाराने हे भयानक पाऊल उचलले. मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षेची प्रती घेऊन रात्री उशिरा वाराणसीहून मुझफ्फरनगरला पोहोचलेल्या टीमच्या एका पोलीस सदस्याने क्षुल्लक कारणावरून त्याच्यासोबत बसलेल्या शिक्षकावर गोळ्या झाडल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी शिक्षकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सध्या पोलिसांनी शिक्षकाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून, टीममधील सर्व लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आरोपी हवालदार दारूच्या नशेत होता आणि रात्री शिक्षकाकडे तंबाखूची मागणी करत होता, असे सांगण्यात येत आहे.