राजधानी दिललीवर दहशतवादी हल्ल्याचे सावट (फोटो- सोशल मीडिया)
प्रजासत्ताक दिनावर दहशतवादी हल्ल्याचे सावट
राजधानी दिल्लीत सुरक्षा यंत्रणेचा चोख बंदोबस्त
दिल्लीसह अन्य शहरांमध्ये हल्ल्याची शक्यता
नवी दिल्ली: भारतात सध्या प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू आहे. राजधानी दिल्लीत पथसंचलनाची तयारी सुरू आहे. दरम्यान भारताच्या प्रजासत्ताक दिनावर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याचा अंदाज गुप्तचर यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आला आहे. सीमेपलीकडून भारताविरुद्ध मोठा कट शिजवला जात असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे दिल्लीत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
सीमेपलीकडून एक अत्यंत घातक आणि हायब्रिड असा कट रचला जात असल्याचे माहिती समोर येत आहे. सीमेपलीकडे असलेले दहशतवाद्यांचे आका आता भारतीय गुंडांना ‘फुट सोल्जर’ म्हणून वापरुन दिल्ली एनसीआर सह अन्य महानगरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी आणि हायब्रिड ‘फुट सोल्जर’ सुरक्षा यंत्रंणासाठी एक आव्हान ठरते आहे. पाकिस्तान आणि कॅनडासारख्या देशातील खलिस्तानी नेता भारतात घुसखोरी करण्याऐवजी देशातील स्थानिक गुन्हेगारांचा वापर करत असल्याचे समोर आले आहे.
हे गॅंगस्टर्स स्लीपर सेलप्रमाणे काम करतात. शस्त्रास्त्रे, गुप्तहेर आणि रसद पुरवण्याचे काम ते करतात. या बदल्यात सीमेपलीकडून त्यांना आधुनिक शस्त्रे आणि पैसे पुरवले जातात अशी माहिती समोर येत आहे. गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार पंजाबमधील गुंडांचा वापर ‘मोहरा’ म्हणून केला जात आहे. हे हरियाणा, दिल्ली एनसीआर, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये अत्यंत सक्रिय असतात. तसेच त्यांनी दहशतवाद्यांशी आपले संबंध प्रस्थापित केले असल्याचे म्हटले जात आहे.
राजधानी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था
कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राजधानी दिल्लीत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे. प्रजासत्ताक दिनाची तयारी दिल्लीत सुरू आहे. त्यामुळे बाहेरील दहशतवादी शक्ती देशातील वाईट शक्तींचा वापर करून विपरीत घडवून आणण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. दिल्लीतील मेट्रो स्टेशन्स, कशमिरी गेट, बस स्थानके यांसारख्या ठिकाणी सुरक्षा वाढवली गेलुई आहे. संशयास्पद वस्तु, माणसांकडे लक्ष ठेवले जात आहे, चौकशी केली जात आहे.
कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तु, बॅग किंवा व्यक्ती आढळून आल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लाल किल्ला, चाँदनी चौक, आणि अन्य ठिकाणी मॉक ड्रिल केले जात आहेत. संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






