‘या’ दिवशी जाहीर होणार भाजपा उमेदवारांची दुसरी यादी, महाराष्ट्रातील नाव असतील का?

लोकसभा निवडणूकीची भाजपची पहिली यादी काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाली होती. यानंतर आता दुसरी यादी देखील समोर येणार असून यामध्ये तरी महाराष्ट्रातील नेत्यांचा समावेश असणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम पुढील आठवड्यामध्ये केव्हाही जाहीर होऊ शकतो. त्यामुळे देशभरामध्ये सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. सत्ताधारी भाजप तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी जंग जंग पछाडत आहे. लोकसभा निवडणूकीची भाजपची पहिली यादी काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाली होती. यानंतर आता दुसरी यादी देखील समोर येणार असून यामध्ये तरी महाराष्ट्रातील नेत्यांचा समावेश असणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. मागच्याच आठवड्यात भाजपाने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली, त्यानंतर शुक्रवारी काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर करताना महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा केलेली नाही. कारण दोन्ही पक्षांची घटक पक्षांसोबतची जागा वाटपाची बोलणी अजून अंतिम झालेली नाहीत.

    मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादी 12 मार्चला जाहीर होणार आहे. 11 मार्चला राजधानी दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. बैठकीच्या दुसऱ्या दिवशी भाजपकडून दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. 150 हून अधिक उमेदवारांची नाव दुसऱ्या यादीत जाहीर केली जाणार आहेत. यात महाराष्ट्रातील उमेदवाराची नाव असतील का?  याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.