देशात आणि महाराष्ट्रात सध्या सरकारच्या नावावर 'सर्कस' सुरू _ अंबादास दानवे
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होताना दिसत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे. आता या सर्व खासदारांचा गट शिंदेंच्या शिवसेनेत विलीन केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. असे असताना आता अंबादास दानवे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, परवा उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली होती. त्यामध्ये चार जण प्रत्यक्ष उपस्थित होते, तर पाच जण ऑनलाईन सहभागी झाले होते. काहींनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मुलाबाळांची, आई-वडिलांची आणि साईबाबांची शपथ घेतली होती. वर्षानुवर्षे चुकीचे पाऊल पडणे अवघड असते. परमेश्वराला साक्ष मानून शपथ घेतली आहे, आता परमेश्वरच त्याचा न्याय करेल. ही चर्चा गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. महिन्यातून एकदा अशा चर्चा होतात. मात्र, प्रत्यक्षात काहीही घडत नाही.
दरम्यान, उद्धव साहेबांच्या शब्दाला किंमत आहे. त्यातील दोघा-तिघांशी साहेबांचे बोलणे झाले आहे. कुणी विमानाने प्रवास केला म्हणून तो पक्ष सोडून गेला असे होत नाही. लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रावर ते म्हणाले, शेवटी पक्षाला पक्षाची पावले उचलावी लागतात. लोकसभा अध्यक्षांना पत्र देणे हे पक्षाने उचललेले एक पाऊल आहे. कुणी संपर्कात आहे म्हणजे तो पक्ष सोडून गेला असे होत नाही. त्यापैकी कुणी स्वतः असे म्हटले आहे का की ते पक्ष सोडून गेले आहेत?, असेही दानवे यांनी म्हटले आहे.
शायना एन. सी. यांच्या विधानावर केलं भाष्य
शायना एन. सी. कोण आहेत? त्या महिला आहेत म्हणून मी जबाबदारीने बोलतो. त्या काही फार मोठ्या पदाधिकारी आहेत का? अशा प्रकारची विधाने लहान कार्यकर्ते करत असतात. काही लोकांच्या हालचाली सुरू आहेत, असे म्हणायला वाव आहे.
शिंदे गटावर टीका…
शिंदे गटाकडे पैशांशिवाय कुठलाही विचार नाही. कोट्यवधी रुपये दिले जातात. मात्र, याकडे ईडी आणि सीबीआय पाहत नाहीत. संजय शिरसाठ यांनी जितकी नमकहरामी केली, तितकी कोणी केली नाही. संघटनेच्या बळावर तीन वेळा निवडून आलेल्या व्यक्तीला नमकहराम म्हणावे लागेल. नागेश पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत.






