नितीश कुमार यांची आज ‘अग्निपरीक्षा’; बिहारमध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड वेग

बिहारमधील सत्ता समीकरणे बदलल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. एकीकडे सत्ताधारी बहुमत सिद्ध करण्यास सज्ज झाले असताना दुसरीकडे विरोधक फाटाफूट होऊ नये यासाठी दक्षता घेत आहेत.

  पाटणा : बिहारमधील सत्ता समीकरणे बदलल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. एकीकडे सत्ताधारी बहुमत सिद्ध करण्यास सज्ज झाले असताना दुसरीकडे विरोधक फाटाफूट होऊ नये यासाठी दक्षता घेत आहेत. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून ‘गेम’ खेळला जात असल्याचा दावा केला जात आहे.

  नितीश कुमार यांनी पुन्हा राजकीय कोलांटउडी मारत राजद, कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांचा समावेश असणाऱ्या इंडिया आघाडीची साथ सोडत पुन्हा भाजपशी मैत्री करून बिहारमध्ये एनडीएचे सरकार स्थापन केले. आता ते नवे सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे.

  राजद आमदार नजरकैदेत

  शक्तिपरीक्षेवेळी काही आमदार सत्ताधारी गोटाच्या बाजूने मतदान करू शकतात, अशी धास्ती विरोधकांना वाटत आहे. राजद संख्याबळाच्या दृष्टीने सर्वांत मोठा पक्ष आहे. राजदचे 79 आमदार आहेत.

  ‘ते’ ५ आमदार गायबच

  दरम्यान, जेडीयूच्या बैठकीत शनिवारी मेजवानीवेळी गैरहजर राहिलेले ते पाच आमदार रविवारी झालेल्या बैठकीतही गैरहजर होते. डॉ. संजीव कुमार, आमदार बीमा भारती, मनोज यादव, दिलीप राय आणि सुदर्शन यांनी या बैठकीकडे पाठ दाखवली होती. त्यांचे मोबाईलही स्वीच ऑफ होते. त्यामुळे एनडीएच्या गोटात धाकधूक वाढली आहे.