संग्रहित फोटो
इम्फाळ : गेल्या महिनाभरापासून जातीय हिंसाचारात मणिपूर (Manipur Violence) होरपळत असून, गुरूवारीही संतप्त जमावाने घरांची जाळपोळ केली तर काही ठिकाणी दंगलखोरांची सुरक्षा दलासोबत झटापटही झाली. इम्फाळमधील न्यू चाकोन येथे जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलाला बळाचा (Manipur) वापर करावा लागला. राज्यात हिंसाचार वाढल्यानंतर लष्कर आणि आसाम रायफल्सच्या जवानांनी कारवाई तीव्र केली आहे. लष्कराच्या तुकड्यांनी गस्त वाढवली असून, जिथे जिथे नाकेबंदी करण्यात आली होती, तिथे ती हटवण्यात आली आहेत.
हिंसाचाराच्या अलीकडील वाढीनंतर लष्कर आणि आसाम रायफल्सच्या ऑपरेशनला गती देण्यात येत आहे. एक दिवसापूर्वी राज्यातील खमेनलोक भागातील एका गावात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात नऊ जण ठार झाले होते, तर 10 जण जखमी झाले होते. बुधवारी पहाटे खामेनलोक भागातील कुकी गावात झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी पुन्हा कारवाई तीव्र केली आहे. एक महिन्यापूर्वी, मणिपूरमधील मेईतेई आणि कुकी समुदायांमधील वांशिक हिंसाचारात 100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.
इंटरनेट बंदीला वाढ
गेल्या महिन्याभरापासून मैतई आणि कुकी समुदायातील वादामुळे मणिपूर राज्यात उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट बंदी कायम राहणार आहे. राज्य सरकारने 20 जून रोजी दुपारी 3:00 वाजेपर्यंत स्थगिती वाढवली आहे. मणिपूरमध्ये अफवा रोखण्यासाठी सरकारने हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर इंटरनेटवरील बंदी 9 व्यांदा वाढवली आहे. 3 मे रोजी पहिल्यांदा ही बंदी लागू करण्यात आली होती. मणिपूरमधील जनजीवन सध्या विस्कळीत झाले आहे. अनेक संघटनांनी इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.