नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठीच्या (Lok Sabha Election) मतदानाची प्रक्रिया शनिवारी पूर्ण झाली. ही निवडणूक एकूण सात टप्प्यात पार पडली. आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले ते निकालाकडे. मतमोजणीचा कालावधी जवळ येऊन ठेपल्याने सर्व राजकीय पक्षांची आणि प्रत्यक्षात निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला 19 एप्रिलला सुरुवात झाली होती. त्या टप्प्यात निवडणूक लढवलेल्या उमेदवारांना निकालासाठी प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली. आता 4 जूनला जाहीर होणाऱ्या निकालामुळे ती प्रतीक्षा संपेल. यावेळच्या निवडणुकीला सगळेच पक्ष प्रचंड ताकदीने सामोरे गेले.
केंद्राची सत्ता सलग दोन वेळा काबीज केलेल्या भाजपने हॅट्ट्रिक करण्याच्या इर्षेने निवडणूक लढवली. भाजपला यावेळी रोखण्याचा निर्धार करून विरोधक लढले. भाजपने मित्रपक्षांसमवेत लोकसभेच्या 400 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले तर, विरोधकांनी इंडिया आघाडी स्थापन करून भाजपापुढे तगडे आव्हान उभे केले.
अखेरच्या टप्प्यात 57 मतदारसंघांसाठी मतदान झाले. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यात 8 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 57 मतदारसंघांत मतदान पार पडले. मतदान होऊ घातलेल्या ठिकाणी 1 कोटी 9 लाख मतदान केंद्रे होती. शेवटच्या टप्प्यात 10 कोटी 6 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.